LIVE Blackbuck Poaching Case: सलमानला आजची रात्रही काढावी लागणार तुरुंगात,जामिनावर उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 07:53 AM2018-04-06T07:53:48+5:302018-04-06T08:51:12+5:30
सलमानच्या जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून सलमानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी केली जाणार असल्याची शक्यता आहे.
जोधपूर- 1998च्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरविलेल्या अभिनेता सलमान खानला आजची (मार्च 6) रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमान खानच्या जामिनावर आता उद्या (मार्च 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनावणी होणार आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला असून उद्या त्यावर सुनावणी केली जाईल. त्यामुळे सलमानचं आज तुरुंगात राहणं निश्चित आहे.
अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी जोधपूर कोर्टात युक्तीवाद झाला. यावेळी सलमानच्या वकिलांनी शिकारीच्या वेळी वापरल्या गेलेल्या जीपबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच प्रत्यक्षदर्शींच्या पुराव्यांवर विश्वास नसल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. दरम्यान, आता अभिनेता सोहेल खान व अरबाज खान जोधपूरला जाणार असल्याचं समजतं आहे. सलमानची केस सोडण्यासाठी मला धमकीचे कॉल आले. फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली असं सलमानचे वकील महेश बोरा यांची सांगितलं.
LIVE-
- सोहेल खान, अरबाज खान जोधपूरला जाणार.
- सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरूवात. सलमानच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू. शिकारीसाठी वापरलेल्या जीपवर प्रश्नचिन्ह.
- सलमानची केस सोडण्यासाठी मला धमकीचे कॉल आले. फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली. सलमानचे वकील महेश बोरा यांची माहिती.
- प्रत्यक्षदर्शींच्या पुराव्यावर विश्वास नाही- सलमानचे वकील
- सलमानच्या जामिनासाठी 51 पानांचा अर्ज. अलवीर खान, बॉडीगार्ड शेरा सत्र न्यायालयात दाखल.
- साडेदहा वाजता सलमानखानच्या जामिनावर होणार सुनावणी. जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी न्यायाधीश कोर्टात पोहचले. न्यायाधीश रविंद्रकुमार जोशी करणार सुनावणी. अर्जातील 54 मुद्द्यांच्या आधारे जामिनाची मागणी.
दरम्यान, जोधपूर तुरुंगाचे डीआयजी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला जेलमध्ये कैदी नंबर 106 देण्यात आला आहे. त्याला तुरुंगातील ड्रेस उद्या देण्यात येणार आहे. तसेच, सलमान खाने तुरुंगातले जेवण नाकारले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले. याचबरोबर, सलमान खाने अजून ड्रेस बदललेला नाही. तो अजून आज घातलेल्याच कपड्यांवर आहे. सध्या त्याने कोणतीही मागणी केलेली नाही. त्याला विशेष सुरक्षेत ठेवण्यात आले आहे, असे विक्रम सिंह यांनी सांगितलं.
1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा तुरूंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर सलमान खान याला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात येणार असून आज त्याला जामीन मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे किमान आजचा दिवस तरी सलमान खानला तुरूंगातच काढावा लागणार आहे. हा निकाल सलमान खानसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.