खटल्यातील दोघे साक्षीदार ठरले महत्त्वाचे, अखेरपर्यंत जबाबावर राहिले ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:35 AM2018-04-06T01:35:59+5:302018-04-06T01:35:59+5:30
ज्या खटल्यांत बडी मंडळी आरोपी असतात, त्यातील साक्षीदार अचानक गायब होतात वा फुटतात, असे अनेकदा आढळून आले आहे. मात्र सलमानविरुद्धच्या खटल्यात पूनमचंद बिष्णोई व छोगाराम हे दोन साक्षीदार अखेरपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम राहिले. त्या दोघांनी दिलेल्या साक्षीमुळे सलमान खानला शिक्षा होऊ शकली.
जोधपूर - ज्या खटल्यांत बडी मंडळी आरोपी असतात, त्यातील साक्षीदार अचानक गायब होतात वा फुटतात, असे अनेकदा आढळून आले आहे. मात्र सलमानविरुद्धच्या खटल्यात पूनमचंद बिष्णोई व छोगाराम हे दोन साक्षीदार अखेरपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम राहिले. त्या दोघांनी दिलेल्या साक्षीमुळे सलमान खानला शिक्षा होऊ शकली.
हे सारे कलाकार रात्रीच जिप्सीमधून निघाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास पूनमचंद बिष्णोई लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. कारचे दिवेही त्यांनी पाहिले. जिप्सीचे दिवे व गोळीबाराच्या आवाजामुळे त्यांनी शेजारी छोगाराम यांना जागे केले. ते दोघेही जिप्सीच्या मागे धावत गेले. जिप्सीमध्ये त्यांनी सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम व सोनाली बेंद्रे यांना पाहिले. या पाचही कलावंतांना पूनमचंद बिष्णोई यांनी लगेचच ओळखले. बिष्णोई यांनी आपल्या साक्षीत हा उल्लेख केला होता.
सलमानच्या हातात शस्त्र होते आणि जिप्सीमधील इतर जण त्याला शिकारीसाठी भरीस घालत होते, असा उल्लेख या दोघांच्या साक्षीमध्ये आहे. पूनमचंद व छोगाराम यांच्या आवाजामुळे गावातील अन्य लोकही जागे झाले आणि जिप्सीच्या मागे धावू लागले. त्यामुळे सलमान व अन्य आरोपींनी शिकार केलेली काळविटे तिथेच सोडून वाहन वेगाने पुढे नेले. मात्र पूनमचंद बिष्णोई यांनी तोपर्यंत जिप्सीचा क्रमांक टिपून घेतला होता. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
शिकार झालेल्या काळविटांचे पोस्टमॉर्टेम आणि पूनमचंद बिष्णोई व छोगाराम यांच्या साक्षी यांमुळे सलमानवरील आरोप सिद्ध करणे सोपे झाले. जिप्सीमध्ये काळविटांच्या रक्तांचे डाग असल्याचेही उघड झाले. या बाबींमुळे सलमानला शिक्षा झाली. आम्ही शिकार केली नाही, किंबहुना काळविटांना बिस्किटे खायला दिली, हा सलमान खानचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला.
बिष्णोई समाजाविषयी
राजस्थानातील बिष्णोई (वैष्णव-विष्णूचा भक्त) समाज कायमच वन्यजीवांचे संरक्षण करीत आला आहे. हा समाज पूर्णत: शाकाहारी आहे आणि निसर्गाशी आपले नाते आजही टिकवून आहे. हा समाज काही अर्थाने कर्मठ आहे आणि दुसरीकडे सुधारकही आहे.
या समाजात मद्यपान, तंबाखू, अफू वा कोणत्याही व्यसनास बंदी आहे. दयाळू राहा, इतरांवर टीका करू नका, वादविवाद करू नका, शुद्ध भाषेत बोला, झाडे तोडू नका, निसर्गाचे, पर्यावरणाचे संवर्धन करा, कोणत्याही जनावराला मारू नका, अजिबात खोटे बोलू नका असे नियम आहेत. त्यांचे आजही पालन केले जाते.
त्यामुळे काळवीट शिकारीची तीव्र प्रतिक्रिया या समाजात उमटली आणि सर्व समाजच सलमान खानच्या विरोधात गेला. या खटल्यातील साक्षीदार न फुटण्यास या समाजाचे नियमच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
खटल्यातील एक आरोपी अद्याप गायबच
वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. हे पाचही जण तसेच दुष्यंत सिंह व दिनेश गावरे नावाचा एक जण १-२ आॅक्टोबर १९९८च्या मध्यरात्री एका जिप्सी कारमधून निघाले. दिनेश गावरे हा महाराष्ट्रातील असून, तो सलमान खानचा साहाय्यक म्हणून ओळखला जात असे.
सलमान कार चालवत होता. काळविटांचा कळप दिसताच सलमानने गोळ्या झाडून त्यातील दोघांना ठार मारले, असा आरोप होता. वन्यजीव संरक्षण कायद्याचा यामुळे भंग झाला. अशा प्रकरणांत किमान १ वर्ष आणि कमाल ६ वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
या प्रकरणातील दिनेश गावरे हा एकदाही न्यायालयात उपस्थित राहिला नाही. किंबहुना हे प्रकरण घडल्यानंतर तो गायबच झाला. तो कुठे आहे वा कुठे गेला, याचा पोलिसांनाही पत्ता लागला नाही. त्यामुळे पाच कलाकार व ट्रॅव्हल एजंट दुष्यंत सिंह यांच्यावरच हा खटला चालला.
सलमानच्या शिक्षेमुळे बॉलिवूड अडचणीत
नवी दिल्ली/मुंबई : सलमान खानला जामीन न मिळता सलग पाच वर्षे शिक्षा भोगावी लागल्यास हिंदी चित्रपटसृष्टी व टीव्ही उद्योगही अडचणीत येणार आहे. सलमान खान सध्या रेस-२ या चित्रपटाचे शूटिंग करीत होता. कोरिओग्राफर रेमो डिसोझा याच्या या चित्रपटाचे बजेट आहे १00 कोटी रुपये. हा चित्रपट अपूर्ण आहे. सलमान बाहेर न आल्यास चित्रपट निर्माते आर्थिक संकटात सापडू शकतील.
याशिवाय ‘भारत’ आणि ‘दबंग ३’ या दोन चित्रपटांचे शूटिंगही सलमान खान नसल्यास रखडू शकेल. हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते व दिग्दर्शकांना त्यामुळेच चिंता वाटत आहे. या तीन चित्रपटांखेरीज बिग बॉस मालिकेच्या १२व्या एडिशनमध्येही सलमान खान सहभागी होऊ शकणार नाही. पूर्णपणे सलमानच्या लोकप्रियतेवरच बिग बॉसचे आतापर्यंत ११ भाग झाले आहेत. त्यामुळे कलर्स वाहिनीचे प्रमुखही सलमान खानला जामीन मिळणार का, याकडे डोळे लावून आहेत. या शोमुळे सलमानला आतापर्यंत करोडो रुपये मिळाले आहेत.
सलमानला शिक्षा झाल्याने बॉलिवूडमध्ये अस्वस्थता आहे. चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी यासंदर्भात म्हटले आहे
की, निकाल ऐकून आपल्याला धक्काच बसला. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे. सलमान हा इंडस्ट्री व लोकांमध्ये अतिशयप्रिय आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सलमानला शिक्षा झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. त्याने मानवतेसाठी खूप मोठे काम केले आहे. त्याला दया दाखवायला हवी, असे त्या म्हणाल्या. तर सलमान या निकालाविरुद्ध अपील करेल, याची खात्री असल्याचे अभिनेता आलोकनाथ म्हणाले.
एफआयआरमध्ये सैफ, तब्बू, सोनाली, नीलमचे नाव नव्हते!
काळवीट शिकार प्रकरणात एफआयआरमध्ये नाव नसतानाही सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांना गुंतविण्यात आले होते. त्यामुळे त्यांची सुटका व्हायलाच पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया अॅड. श्रीकांत शिवदे यांनी दिली.
या प्रकरणात अॅड. शिवदे यांनी चौघांच्या वतीने खटला चालविला होता. ते म्हणाले, या प्रकरणात अनेक खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली होती. या चौघांचे एफआयआरमध्ये नावच नव्हते. ओळख परेडही झाली नाही. या कलाकारांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा झालेल्या उलटतपासणीत साक्षीदार कोणालाही ओळखू शकला नव्हता.