भय्यूजी महाराजांना ‘ती’ तरुणी आणि सेवादार करीत होते ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:38 AM2019-01-20T04:38:55+5:302019-01-20T04:39:43+5:30
भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येला पलक नावाची एक तरुणी आणि सेवादार विनायक दुधाळे व शरद देशमुख हे कारणीभूत असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
इंदूर : भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येला पलक नावाची एक तरुणी आणि सेवादार विनायक दुधाळे व शरद देशमुख हे कारणीभूत असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. दाती महाराज यांचे प्रकरण समोर आल्यानंतर भय्यूजी महाराज विचलित झाले होते. त्याचा फायदा घेत या तिघांनी महाराजांवर पलकशी लग्न करण्यासाठी दबाव वाढविला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांसारखे तुरुंगात जावे लागेल, अशा धमक्या ते महाराजांना देत होते, असे तपासातून पुढे आले आहे.
डीआयजी हरिनारायणाचारी मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भय्यूजी महाराजांचा ड्रायव्हर कैलास पाटील याला वकील निवेश बडजात्या यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली. कैलास पाटीलने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी १२५ जणांची चौकशी केली, तसेच २८ लोकांचे जबाब घेतले.
मिश्रा यांनी सांगितले की, भय्यूजी महाराजांची पहिली पत्नी माधवी यांचे निधन झाल्यानंतर विनायक व शरद यांनी कट रचून पलक हिला महाराजांच्या आयुष्यात आणले. महाराज आणि पलक यांच्यातील अश्लील चॅटिंग त्यांनी सेव्ह करून ठेवले. काही आपत्तीजनक व्हिडिओही बनविले. या सामग्रीचा वापर करून ते महाराजांना ब्लॅकमेल करू लागले. महाराजांनी पलकशी लग्न करावे, अशी त्यांची मागणी होती.
१७ एप्रिल २0१७ रोजी महाराजांनी आयुषी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. तेव्हा पलक आणि तिच्या साथीदारांनी जोरदार हंगामा केला. १६ जूनच्या आत लग्न करण्याची मुदत पलकने महाराजांना दिली होती. दाती महाराजांना अटक झाल्यानंतर तिघांनी महाराजांवर आणखी दबाव वाढविला. विनायक महाराजांना काबूत ठेवत असे, पलक लग्नासाठी दबाव वाढवीत असे, तर शरद पैसे उकळीत असे, असे समोर आले आहे. भय्यूजी महाराजांना काही औषधे सुरू होती. त्याचा फायदा घेत हे तिघे त्यांना नशिल्या औषधांचा ओव्हर डोस द्यायचे. त्यामुळे महाराजांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत गेल्याचे उघडकीस आले आहे.