साहित्य संमेलनाला गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:26 AM2018-02-19T03:26:34+5:302018-02-19T04:05:36+5:30
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी दुपारी ग्रंथ प्रदर्शनातील प्रकाशकांच्या उद्रेकाने गालबोट लागले.
बडोदे : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी दुपारी ग्रंथ प्रदर्शनातील प्रकाशकांच्या उद्रेकाने गालबोट लागले. मराठी वाङ्मय परिषद बडोदाचे सदस्य आणि प्रधान डेकोरेटर्सचे सुजित प्रधान यांच्या दमदाटीविरोधात आवाज उठवित ग्रंथप्रदर्शनात सहभागी प्रकाशकांनी एकत्र येत संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांना घेराव घातला. अपुरे नियोजन, ढिसाळ व्यवस्था आणि प्रधान यांच्या दमदाटी व गुंडगिरीचा मनस्ताप झालेल्या प्रकाशकांनी सांस्कृतिक कार्यक्रम बंद करण्याचा इशारा दिला होता.
या संमेलनात ग्रंथप्रदर्शनात प्रकाशकांनी घेतलेल्या अतिरिक्त वस्तूंचे भाडे आताच्या आता द्या, असे म्हणत सुजित प्रधान आणि त्यांच्या माणसांनी प्रकाशकांना धमकाविले. शिवाय, स्टॉल्सवरील वस्तूही जप्त केल्या. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशकांनी एकत्र येत याविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. प्रधान यांनी केलेल्या अरेरावीमुळे आणि गुंडगिरीच्या वर्तणुकीमुळे प्रकाशकांचा राग अनावर झाल्याचे दिसून आले. या तीनदिवसीय प्रदर्शनात प्रकाशकांना वीज, पाणी, मंडप, पंखे, टेबल या मूलभूत सोयीसुविधाही पुरविल्या नाहीत. काही प्रकाशकांच्या स्टॉल्समध्ये पंख्यांची व्यवस्था केली नाही, त्यामुळे रणरणत्या उन्हात या प्रकाशकांना तसेच ताटकळत राहावे लागले. प्रकाशकांनी स्टॉलचे पडदेही स्वत:च लावले, पाण्याची सोय नव्हती, आवारात स्वच्छतागृह नव्हते.
या ग्रंथ प्रदर्शनात एकूण नामांकित प्रकाशकांसह छोट्या प्रकाशकांचे मिळून एकूण १३७ स्टॉल्स होते. या ग्रंथप्रदर्शनासाठी प्रत्येक प्रकाशकाकडून तीन दिवसांसाठी चार हजार रुपयांचे भाडे आकारण्यात आले. त्यात प्रदर्शन मैदानात असल्याने ओल्या गवतामुळे पुस्तकांना वाळवी लागल्याची तक्रार यावेळी प्रकाशकांनी मांडली. दवामुळे झालेल्या चिखलामुळे पुस्तकांचे नुकसान झाल्याचे प्रकाशकांनी सांगितले. या ठिकाणच्या साहित्यसंपदेच्या मालमत्तेची सुरक्षाही वाºयावरच असल्याची खंत व्यक्त झाली.
तीन दिवसांत १० लाखांचीही विक्री नाही
डोंबिवली आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रदर्शनात मिळून जवळपास १० कोटींच्या घरांत प्रदर्शनविक्रीची उलाढाल पोहोचली होती. यंदाच्या संमेलनात मात्र वाचकवर्ग पुस्तके चाळायला फिरकला नाही. त्यामुळे सर्व स्टाल्सची मिळून प्रदर्शनाची तीन दिवसांची उलाढाला १० लाखांच्या घरातही पोचली नाही.