उदयपूर-अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर स्फोट, 13 दिवसांपूर्वीच PM नरेंद्र मोदींनी केले होते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 02:59 PM2022-11-13T14:59:04+5:302022-11-13T14:59:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 ऑक्टोबर रोजी उदयपूर-अहमदाबाद रेल्वे लाइनचे उद्घाटन केले होते.
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे ट्रॅक उखाडण्यासाठी स्फोट करण्यात आला असून घटनास्थळी बारूदही(दारु) सापडली आहे. याप्रकरणी पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या नवीन मार्गावर मोठा अपघात टळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा ओढा रेल्वे पुलाच्या साळुंबर मार्गावर ही घटना घडली. काल रात्री 10 वाजता गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज आला. यानंतर काही तरुण तातडीने ट्रॅकवर पोहोचले. तिथली अवस्था पाहून सगळेच थक्क झाले. रेल्वे रुळावर बारूद पडल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पूल उडवण्याचा कट असल्याचे दिसत आहे.
या स्पोटामुळे अनेक ठिकाणी रुळ तुटलेला दिसत असून, नट-बोल्टही गायब झाल्याचे दिसून आले. रुळावर लोखंडाचा पातळ पत्राही तुटलेला आढळून आला. या घटनेला दुजोरा देताना उदयपूरचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा म्हणाले की, एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तपासानंतरच नेमकी स्थिती कळेल. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून, दोन्ही बाजुने येणाऱ्या गाड्या रोखण्यात आल्या आहेत.