पंतप्रधान मोदींच्या दत्तक गावावर योजनांचा कृपावर्षाव
By admin | Published: May 26, 2015 02:18 AM2015-05-26T02:18:09+5:302015-05-26T02:18:09+5:30
जयापूर गावावर आज आनंदाची पखरण झाली आहे. केवळ १९७ दिवसांमध्ये हा बदल झाला. ७ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गावाला दत्तक घेतले होते.
विकास मिश्र - जयापूर (वाराणसी)
जयापूर गावावर आज आनंदाची पखरण झाली आहे. केवळ १९७ दिवसांमध्ये हा बदल झाला. ७ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गावाला दत्तक घेतले होते. या गावात ५ तास घालविल्यानंतर वाटले, देशातील ६ लाख ३८ गावांचे नशीबही असेच पलटावे.
जयापूरमध्ये नव्याने बनविण्यात आलेल्या बस स्थानकाच्या प्रतीक्षालयात एका डॉक्युमेंटरीचे पोस्टर लावलेले आहे. ‘जयापूर का जलवा’ असे त्याचे नाव. जयापूर हे गाव मोदींच्या जलव्यात आकंठ बुडाले आहे, असेच दिसते. मी सरपंच दुर्गावती पटेल यांना भेटायला चाललो आहे. रस्त्यात भेटलेले दिनेशसिंग या गावाची कहाणी सांगत आहेत. गावात काय-काय झाले आणि काय होणार आहे. गावाला जणू भरारीचे पंख लागले आहेत. या गावाचे रहिवासी असल्याचा अभिमान सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. तसे नारायण पटेल यांनाच सरपंच संबोधले जाते; कारण तेच दुर्गावती यांचे सारे काम सांभाळतात. ते त्यांचे दीर आहेत. दिल्लीतील दोन पत्रकारांना मोदी या गावाचा हालहवाल विचारतात, असे ते म्हणाले. ४२०० लोकसंख्येचे हे गाव मोदींनी दत्तक घेतले त्या वेळी अन्य गावांसारखीच त्याची अवस्था सर्वसाधारण होती. शिक्षणासाठी केवळ एक शाळा, येण्या-जाण्यासाठी कोणतेही सार्वजनिक वाहन नाही. उत्तर प्रदेशच्या अन्य गावांप्रमाणेच विजेचा ठावठिकाणा नाही. जवळचे रुग्णालयही १ किमी दूर. मोदींनी हे गाव दत्तक घेताच योजनांचा वर्षाव सुरू झाला. आठवड्यातच युनियन बँकेने तेथे शाखा उघडली. ही शाखा पूर्णपणे संगणकीकृत असून, सौरऊर्जा पॅनेलच्या माध्यमातून तिचे काम चालते. गावकऱ्यांना ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज देण्यात आले आहे. सर्व गावकऱ्यांचे तेथे बँक खाते आहे. आता भारतीय स्टेट बँकेची शाखाही उघडली आहे. एलआयसीने या गावासाठी खास विमा पॉलिसी सुरू केली आहे.
मुशहरांसाठी
१४ नवी घरे
१४ गरीब मुशहर कुटुंबांसाठी तेथे नवी घरे बांधली आहेत. मुशहर हे अनुसूचित जातींचे अतिशय गरीब लोक आहेत. मुंबईच्या एलेना अॅण्ड सन्स कंपनीने ही घरे बनविली आहेत. एक खोली, बाथरूम, शौचालय, स्वयंपाकगृह आणि छोटेसे आंगण अशी या घरांची रचना आहे. या घरांमध्ये २४ तास वीज राहावी यासाठी सौरदिवे लावण्यात आले आहेत. २४ तास पाण्यासाठी छतावर टाकी आहे. घरात आनंदी वातावरण राहावे यासाठी घरांसमोर छोटीशी बागही आहे.
युवकांना हवी स्टार्स नाइट
गावकऱ्यांच्या इच्छा पूर्ण होत असल्याने नव्या इच्छा आकांक्षाचा जन्म होऊ लागला आहे. येथे सिनेस्टार्स यावेत. हीरो-हीरोईन आल्या नाही तरी चालेल, निदान भोजपुरी कलाकार यावेत. थोडे नाचगाणे व्हावे, अशी युवकांची इच्छा आहे. मुलायमसिंह यांच्या गावात मोठे जलसे होतात. मोदींनीही असेच जलसे आमच्या गावात आयोजित करावेत, असे एका युवकाने म्हटले.
अखिलेश यादव यांच्याकडून शह
मोदींना शह देण्यासाठी अखिलेश
यादव यांनी जयापूरलगतच्या चंद्रपूर, जक्खिनी, सिंघाई, नरसरा, मुरई आणि जमुआ या गावांना आदर्श लोहिया ग्राम योजनेत सामील केले आहे. या गावांचे नशीब कधी पालटणार ते बघावे लागेल.
गावात सर्वच हिंदू
या गावात सर्वच हिंदू का आहेत? अन्य धर्माचे लोक का नाहीत, या प्रश्नावर नारायण पटेल यांनी मोगल काळातील किस्सा ऐकविला. येथील मंदिरावर औरंगजेबाच्या सैन्याने हल्ला केला तेव्हा गावकऱ्यांनी सैन्य परत पाठवत विजय मिळविला होता. त्यामुळे या गावाचे नाव जयापूर असे पडले. ते मंदिर आता राहिले नसले तरी काही भग्न मूर्ती आहेत.
सौरदिव्यांनी उजळले गाव
उत्तर प्रदेशच्या इतर गावांप्रमाणेच या गावातही विजेचा लपंडाव सुरू असायचा. स्वप्नातही २४ तास विजेचा विचार शक्य नव्हता, मात्र आता सौरऊर्जेने अंधार दूर पळविला आहे. या गावात २००हून जास्त सौर पथदिवे आहेत. त्यामुळे रात्रीला हे गाव प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघते. २५ किलोवॅटचा सौर प्रकल्प बनत आहे. त्यानंतर या गावाच्या प्रत्येक घरात सौरऊर्जेची वीज राहील.
‘मन की बात’
प्रत्येक घरासमोर सौरकंदील टांगलेला दिसून येतो. मुनिया यादव सांगत होती, या कंदिलात रेडिओही आहे. मोदीजी ‘मन की बात’ करतात तेव्हा याच रेडिओवर आम्ही ऐकतो. या कंदिलावर मोबाइलही चार्ज होतात. हा सौरकंदील कमालीचा आहे.
दूध डेअरी हवी
गावकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विद्यासागर सिंग आणि तेजबहादूरसिंग यांनी, या गावात दूध डेअरी आली तर गावांचे उत्पन्न वाढेल, असा दावा करतानाच मोदीजींना याबाबत विनंती करणारे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगितले.
मोफत वीज
येथील गावकऱ्यांना मोफत वीज मिळत असून, बनारस हिंदू विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी विकसित केलेले बियाणे त्यांना देण्यात आले आहे. कृषक भारती सहकारी बँकेने कांदा, वाटाणा आणि अन्य भाज्यांचे बियाणे मोफत दिले आहे.
आरोग्य शिबिर
या गावात अद्यापपर्यंत कोणतेही प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय नाही. ७ नोव्हेंबर २०१४ पासून या गावात चार वेळा आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. त्यात गंभीर आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.