लेकाचा मृत्यू झाल्याचं दृष्टीहीन वृद्ध दाम्पत्याला समजलंच नाही; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:22 PM2024-10-29T15:22:31+5:302024-10-29T15:23:11+5:30

तेलंगणातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

blind parents did not know that they were living with their sons dead body | लेकाचा मृत्यू झाल्याचं दृष्टीहीन वृद्ध दाम्पत्याला समजलंच नाही; काळजात चर्र करणारी घटना

लेकाचा मृत्यू झाल्याचं दृष्टीहीन वृद्ध दाम्पत्याला समजलंच नाही; काळजात चर्र करणारी घटना

तेलंगणातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दृष्टीहीन वृद्ध दाम्पत्याला आपल्या मुलाचा मृतदेह घरात असल्याचं समजलंच नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वृद्ध दाम्पत्याची काळजी घेतली आणि नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी पाठवलं. मात्र या तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, ६५ वर्षीय के शांता कुमारी, ६० वर्षीय के रमन्ना आणि ३० वर्षीय के प्रमोद हे तिघे नागोल येथील एका घरात राहत होते. प्रमोद आपल्या आई-वडिलांच्या सर्व गोष्टींची काळजी घेत असे, त्यांची सेवा करायचा. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अनेक दिवसांपासून आई-वडील आपल्या मुलाच्या मृतदेहासोबत राहत होते. पण ते त्यांना कळलंच नाही.

रिपोर्टनुसार, पोलीस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा वृद्ध दाम्पत्य बेशुद्ध होतं आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तसेच त्यांना घराजवळ पोहोचल्यावर प्रमोदचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला अंघोळ घालून जेवण दिलं. त्यांची काळजी घेतली. वृत्तपत्राशी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, "झोपेतच प्रमोदचा मृत्यू झाल्याचा आम्हाला संशय आहे."

मुलाच्या मृत्यूनंतर, दाम्पत्याला अन्न किंवा पाणी देण्यासाठी कोणीही नव्हतं. तसेच अशक्तपणामुळे दाम्पत्याला हात-पायही हलवता येत नव्हते. तपासादरम्यान त्याचा मोठा मुलगा प्रदीप सरूरनगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रदीपला घटनेची माहिती देण्यात आली आणि प्रमोदचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. प्रदीप आल्यानंतर मृतदेह त्याच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: blind parents did not know that they were living with their sons dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.