मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर १६ रुग्णांना अंधत्व
By admin | Published: December 2, 2015 03:45 AM2015-12-02T03:45:10+5:302015-12-02T03:45:10+5:30
हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांच्या शहरातील नेत्र शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर १६ रुग्णांची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २४ नोव्हेंबर रोजी
अंबाला : हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांच्या शहरातील नेत्र शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर १६ रुग्णांची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २४ नोव्हेंबर रोजी हे नेत्र शिबीर घेण्यात आले होते.
अंबालाच्या महेशनगर येथील सर्व कल्याण सेवार्थ समितीने आपल्या धर्मादाय रुग्णालयात या नेत्र शिबिराचे आयोजन केले होते, तेथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर या रुग्णांना दृष्टी गमवावी लागली. आरोग्यमंत्री वीज यांनी या घटनेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. समितीने आरोग्य विभागाची परवानगी न घेताच हे नेत्र शिबीर आयोजित केले. आमच्या पथकाने रुग्णालयावर धाड घातली, पण तेथे कुलूप लावलेले दिसले. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. विनोदकुमार गुप्ता यांनी दिली. सरकारकडून प्रत्येक रुग्णामागे १००० रुपये मिळत असल्याने अशा समित्या नेत्र शिबिरे घेत असतात. डोळे गेलेल्या रुग्णांना चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोळ्यांची स्थिती वाईट असल्याचे या रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)