१० हजार खासगी शाळांना टाळे; नव्या शाळांचे अर्ज मात्र चौपटीने वाढले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 06:10 AM2022-08-13T06:10:27+5:302022-08-13T06:10:36+5:30
२०२१ मध्ये कोरोनामुळे ५,४०६ खासगी शाळांना कुलूप लागले.
नवी दिल्ली : देशात गेल्या दोन वर्षांत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तर खासगी शाळांमधील घटली आहे. यामुळे १० हजार खासगी शाळा बंद झाल्या आहेत. असे असताना नव्या खासगी शाळा सुरू करण्यासाठीचे अर्ज मात्र चौपटीने वाढले आहेत. नव्या खासगी शाळा सुरू करण्यासाठी २०२१ मध्ये २,०६६ अर्ज आले होते. २०२२ मध्ये ही संख्या ९,०५७ वर गेली. शाळा सुरू करू इच्छिणाऱ्यांचे प्रमाण ४.३८ पटीने वाढले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, २०२१ मध्ये कोरोनामुळे ५,४०६ खासगी शाळांना कुलूप लागले. २०२० मध्ये ५,०५२ खासगी शाळा बंद झाल्या. याच दोन वर्षांत खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संख्येत ३०.५२ लाख एवढी घट झाली, तर सरकारी शाळांत २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये ४० लाख विद्यार्थी वाढले. २०२१ मध्ये पहिल्या इयत्तेत १.८५ कोटी नवे प्रवेश झाले. १.१९ कोटी प्रवेश सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये झाले.
शाळा सोडणारे सर्वाधिक कुठे?
मध्य प्रदेशात दर १०० मुलींपैकी २४ मुली दहावीपूर्वीच शाळा सोडत आहेत. मुलींच्या गळतीचे प्रमाण चंडीगडमध्ये १.६ टक्के आणि केरळमध्ये ४.९ टक्के सर्वात कमी आहे.