रक्त आहे कमी, तुम्हीच घ्या हमी; आज जागतिक रक्तदाता दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:34 AM2024-06-14T06:34:09+5:302024-06-14T06:35:00+5:30
World Blood Donor Day: १४० काेटींच्या आपल्या देशात रक्ताचा सर्वाधिक तुटवडा पडतो. भारताला दरवर्षी सुमारे १.५ काेटी पिशवी रक्ताची गरज आहे. मात्र, १ काेटी पिशव्या कमी पडतात. हा आकडा २०२३ मधील आहे. कर्कराेग, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज असते.
नवी दिल्ली - १४० काेटींच्या आपल्या देशात रक्ताचा सर्वाधिक तुटवडा पडतो. भारताला दरवर्षी सुमारे १.५ काेटी पिशवी रक्ताची गरज आहे. मात्र, १ काेटी पिशव्या कमी पडतात. हा आकडा २०२३ मधील आहे. कर्कराेग, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज असते. मात्र, तुटवडा असल्यामुळे अनेकांचा मृत्यू हाेताे. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. १४ जून हा जागतिक रक्तदाता दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाबाबत जाणून घेऊ या...
- १९४९ मध्ये काेलकाता येथे भारतातील पहिली रक्तपेढी स्थापन झाली.
- १.५ काेटी पिशव्या रक्ताची गरज भारतात दरवर्षी असते.
- ०१ काेटी पिशव्या रक्ताचाच पुरवठा हाेत आहे.
- दर २ सेकंदाला काेणाला तरी रक्ताची गरज भासते.
- दर ३ लाेकांपैकी एकाला तरी आयुष्यात रक्ताची गरज भासू शकते.
- १ हजार लाेकांमागे ३४ जणांनी वर्षातून किमान एकदा रक्तदान करायला हवे.
- २०.३ युनिट रक्त एका खाटेमागे दरवर्षी रक्त गाेळा व्हायला हवे.
- ४०.२ काेटी लाेक पात्र रक्तदाते २०२२ मध्ये भारतात एका अहवालानुसार हाेते.
- ५ ते ६ लीटर रक्त माणसाच्या शरीरात असते.
- दर ९० दिवसांनी रक्तदान करता येते.
- रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या ७ रुग्णांपैकी एकाला रक्ताची गरज भासू शकते.
- ३ जणांचे प्राण रक्ताची एक पिशवी वाचवू शकते.
असे असते तुमचे रक्त
- ५ दिवसांपर्यंत प्लेटलेट्स साठवून ठेवता येऊ शकतात. १० ते १५ मिनिटांमध्ये एक पिशवी रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण हाेते.
- २४ ते ४८ तासांमध्ये प्लाझ्माची प्रतिपूर्ती हाेते. लाल रक्तपेशींचे प्रमाण ३ आठवड्यांमध्ये पूर्ववत हाेते. प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशी लगेच पूर्ववत हाेतात.