बिहार निवडणुकीत निळ्या चिमण्यांचा टिवटिवाट
By admin | Published: October 16, 2015 11:30 PM2015-10-16T23:30:32+5:302015-10-16T23:30:32+5:30
आरोप - प्रत्यारोपाने गाजत असलेल्या बिहार निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मैदानापेक्षा ट्विटरवरच एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत.
सतीश डोंगरे
आरोप - प्रत्यारोपाने गाजत असलेल्या बिहार निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मैदानापेक्षा ट्विटरवरच एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत वा माजी मुख्यमंत्री नितीशकुमार, लालूप्रसाद यादव असोत, ही सगळीच मंडळी ट्विटरवर एकमेकांवर हल्लाबोल करीत आहेत. दिवसाला सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक ट्विट निवडणुकीवर आधारित असल्याने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ‘ट्विट वॉर’ आणखी पेटण्याची शक्यता आहे.
निवडणुकांमध्ये सोशल मीडिया प्रभावी ठरत असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी या माध्यमांवर तुटून पडत आहेत. बरेच पक्ष या काळात प्रचारासाठी स्वतंत्र अकाउंट््स, पेजेस तयार करून त्यावर दिवसातील प्रत्येक घडामोडी अपडेट करीत असतात. काही पक्षांकडून तर याकामी तज्ज्ञांची स्वतंत्र टीमच तयार केली जाते. नेमका हाच कित्ता बिहार निवडणुकीत गिरविला जात आहे.
सभा, बैठका, रॅली, प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच सोशल मीडियांवरील प्रचारासाठी दिग्गज नेतेमंडळी आसुसलेली असल्याचे बघावयास मिळत आहे. त्यात ट्विटर अधिक प्रभावी ठरत असून, निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच ट्विटरवर शाब्दिक चकमक चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला
आहे.
यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले ट्विट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बिहारींच्या डीएनए’बाबत केलेले वक्तव्य होय. हे ट्विट सर्वाधिक वेळा रिट्विट करून नीतिशकुमार व लालू यांनी मोदींच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला, तर मोदींचे बिहार पॅकेज हे दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक वादग्रस्त ट्विट ठरले.
केवळ बिहारमधूनच नव्हे तर देशभरातील विविध प्रादेशिक पक्षांच्या नेतेमंडळींनी मोदींच्या या पॅकेजवर ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली, तर नीतिशकुमार, लालू यांच्या जंगलराजवरून उपस्थित केला जात असलेला मुद्दाही ट्विटवरूनच छेडला गेला. तसेच दादरी प्रकरणावरून मौन बाळगल्याने टीकेचे धनी ठरत असलेल्या मोदींनी ट्विटवरूनच मौन सोडले.
या ट्विट वॉरमध्ये माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, असदुद्दीन ओवेसी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंग, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, सुशीलकुमार मोदी, रामकृपाल यादव, गिरीराज सिंग आदी आघाडीवर आहेत.