ब्लू व्हेल गेममुळे त्यांनी गमावला एकुलता एक मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 09:20 AM2017-10-30T09:20:24+5:302017-10-30T09:51:16+5:30
मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमची दहशत अजूनही कायम आहे.
नवी दिल्ली- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमची दहशत अजूनही कायम आहे. अजूनही लहानांबरोबरच तरूणही या खेळाच्या जाळ्यात अडकलेले पाहायला मिळत आहेत. हरियाणाच्या सिरसामधील डबवालीमध्ये ब्लू व्हेल गेमने एका 25 वर्षीय तरूणाचा जीव घेतला आहे. योगेश उर्फ जिम्मी सिंगला याचा गुरूवारी तलावात बुडून मृत्यू झाला. योगेशचा मृत्यू तलावात बुडल्याने झाल्याचं सुरूवातीला बोललं जात होतं. पण योगेशच्या मृत्यूच्या तीन दिवसांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूबद्दल खुलासा केला आहे. योगशचा मृत्यू होणं हा अपघात नसून ब्लू व्हेल गेममुळे त्याने आत्महत्या केल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार योगेशने तीन टास्क पूर्ण केले होते आणि चौथ्या टास्कमध्ये त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला.
चंदीगडमध्ये शिकणारा जिम्मी गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. त्याच्या तणावाचं कारण मोबाइलमधील गेम होतं. पण याबद्दलची कुठलीही कल्पना त्याच्या घरच्यांना नव्हती. गुरूवारी मौजगड गावातील भाखडा तलावाजवळ जाऊन योगेशने त्याचे वडील सुरेंद्र सिंगला यांना फोन केला होता. फोनवरून त्याने वडिलांना आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याच्या आत्महत्येबद्दलचं बोलणं ऐकून त्याचा पाठलाग केला तसंच त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तलावात उडी मारली.
योगेशला पोहता येत होतं पण मरण्याचं निश्चित केलेल्या या तरूणाने तलावाच्या बाहेर यायचे प्रयत्न केले नाहीत, असं बोललं जातं आहे. योगेश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याला काही दिवसांपूर्वी ब्लू व्हेल गेम खेळताना पकडलं होतं. त्यानंतर त्यांनी योगेशला गेम न खेळण्याबद्दल समजावलंही होतं. त्यावेळी ब्लू व्हेलचे तीन टास्क पूर्ण केल्याचं त्याने सांगितलं होतं. नातेवाईकांनी ही गोष्ट योगेशच्या आई-वडिलांना सांगितली नाही. त्यामुळे योगेशने गेम खेळणं बंद केलं नाही. तो नेहमी खेळताना पाहायला मिळत होता.