तामिळनाडूमध्येही ब्लू व्हेलचा बळी, ब्लू व्हेलच्या सूत्रधार मुलीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 02:40 AM2017-09-01T02:40:30+5:302017-09-01T02:41:09+5:30
आॅनलाइनवर जीवघेणा ठरलेला ब्लू व्हेल गेमचा पहिला बळी येथील विघ्नेश (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठरला आहे. तामिळनाडूतील हा या गेमचा पहिला बळी आहे.
मदुराई : आॅनलाइनवर जीवघेणा ठरलेला ब्लू व्हेल गेमचा पहिला बळी येथील विघ्नेश (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठरला आहे. तामिळनाडूतील हा या गेमचा पहिला बळी आहे. मदुराईच्या पोलीस अधीक्षकांनी हा ब्लू व्हेल गेमचा बळी असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश मन्नारच्या तिरूमलाई नायकर महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसºया वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी सायंकाळी तो त्याच्या घरी छताला फास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या वडिलांना आढळला. त्याच्या हातावर धारदार वस्तूने ब्लू व्हेलचे चित्र काढलेले होते. त्याच्या घरी जी चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या चिठ्ठीत त्याने लिहिले होते की, ब्लू व्हेल खेळ नाहीतर धोका आहे. एकदा का तुम्ही त्यात प्रवेश केला की कधीही बाहेर पडू शकत नाहीत. (वृत्तसंस्था)
नवी दिल्ली : ब्लू व्हेल चॅलेंज या नावाने अनेक गटांचे नेतृत्व करीत असल्याचा ठपका ठेवून १७ वर्षांच्या रशियन मुलीला अटक करण्यात आली. तिचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. या खेळातील आव्हान (चॅलेंज) पूर्ण न करणाºया किंवा खेळण्यास नकार दिलेल्यांना जीव घ्यायच्या धमक्या देण्यास ती जबाबदार असल्याचे वृत्त आहे.
या खेळाचा शेवट आत्महत्येत होतो. ही मुलगी ‘डेथ ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटर’ अशीच ओळखली जात आहे, असे रशियाच्या चौकशी यंत्रणेने म्हटले.
ती स्वत: ब्लू व्हेल चॅलेंज खेळाडू होती. तिने ते आत्महत्येकडे नेणारे आव्हान पूर्ण केले नाही. त्याऐवजी ती त्या खेळाची अॅडमिन बनली. या ग्रुपवरील कित्येक डझन सदस्यांना ही मुलगी बहुतेक वेळा जीव जाण्याचीच शक्यता असलेली आव्हाने पाठवायची.