मंदिरावरील बॉम्बहल्ल्याचा कट उधळला
By admin | Published: February 27, 2017 05:49 AM2017-02-27T05:49:24+5:302017-02-27T05:49:24+5:30
गुजरामधील चोटिला चामुंडा माता मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या दोन संशयितांना एटीएसने अटक केली
राजकोट : गुजरामधील चोटिला चामुंडा माता मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या दोन संशयितांना एटीएसने अटक केली. वसिम रामोदिया आणि नईम रामोदिया अशी या दोन संशयितांची नावे आहेत. ते दोघे भाऊ आहेत.
एटीएसचे उपाधीक्षक के. के. पटेल यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे एटीएस टीमने ही कारवाई केली आहे.
वसिमला राजकोट येथून तर त्याचा भाऊ नईमला भावनगर येथून अटक करण्यात आली. बॉम्ब बनविण्याचे साहित्य त्यांच्याकडे आढळून आले आहे. त्यांच्या अटकेमुळे मोठा अतिरेकी हल्ला टळला आहे. या दोघांकडे गन पावडर, बॅटरी व देशी बॉम्ब आणि मास्क आदी साहित्य होते. वादग्रस्त माहिती असलेले एक संगणकही जप्त करण्यात आले. ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते देशाबाहेर दहशतवाद्यांशी संपर्कात होते, असा दावाही केला जात आहे.
एकूण ६८ संशयित अटकेत
‘इसिस’चे समर्थक असल्याच्या संशयावरून भारतात आत्तापर्यंत ६८ जणांना अटक करण्यात आलेले आहे. यापैकी सर्वाधिक ११ महाराष्ट्रातील आहेत. गेल्या वर्षी ‘इसिस’च्या बाजूने लढण्यासाठी गेलेल्या केरळमधील २० जणांच्या गटापैकी हाफिजुद्दिन ठेके कोलेथ हा २१ वर्षांचा तरुण अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात लढताना मारला गेल्याचा संदेश त्याच्या कुटुंबीयांना ‘इसिस’कडून पाठविण्यात आला.