जम्मू-काश्मीरमध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 10:17 IST2024-04-16T10:10:45+5:302024-04-16T10:17:31+5:30
या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. श्रीनगरमधील बटवाराजवळ झेलम नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १२ जणांना रेक्स्यू करण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच, तीन मुले बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून शोध मोहीम सुरू आहे.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात हवामान खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या ७२ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदी धोक्याच्या चिन्हाजवळून वाहत आहे. तसेच, राज्यात गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.
दुसरीकडे, पूंछ जिल्ह्यातील मेंढर भागात सुरू असलेल्या पावसामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेंढरच्या छत्राल भागात नदीच्या मध्यभागी जोरदार प्रवाहात अडकलेल्या चार जणांची सुटका करण्यात आली आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच, नद्यांच्या जवळ थांबू नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.