पूरग्रस्त भागात नदीतून पोहचली नाव, लसीकरणासाठी जमवला गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 10:05 AM2021-07-10T10:05:58+5:302021-07-10T10:12:36+5:30
मुझफ्फरनगरमधील बागमती नदीत लसीकरण करणार नाव उतरली आहे. पहिल्या टप्प्यात कटरा परिसरात दोन नाव सुरू करण्यात आल्या आहेत. सिव्हील सर्जन डॉ. विनयकुमार शर्मा यांनी पाण्यात उतरुन नावेला मार्गस्थ केलं.
लखनौ - कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे लसीकरण असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही लसीकरण हाच कोरोनावरील उपाय असल्याचं वारंवार म्हटलं. त्यामुळे, देशातील लसीकरण मोहीम गतीमान करण्यात आली आहे. गावखेड्यापर्यंत लस पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोग्य विभागातील कर्मचारीही कसोशीने प्रयत्न करत आहेत. मुझफ्फरनगरमधील असाच एक प्रयत्न अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुझफ्फरनगरमधील बागमती नदीत लसीकरण करणार नाव उतरली आहे. पहिल्या टप्प्यात कटरा परिसरात दोन नाव सुरू करण्यात आल्या आहेत. सिव्हील सर्जन डॉ. विनयकुमार शर्मा यांनी पाण्यात उतरुन नावेला मार्गस्थ केलं. प्रत्येक नावेत दोन एएनएम, दोन गोताखोर आणि नाविक असणार आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून ही नावेतील लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कटरा येथील 14 ग्रामपंचायतींच्या पूरग्रस्त भागात नावेतून जाऊन येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
#LargestVaccineDrive
— PIB In Bihar 🇮🇳 Mask yourself 😷 (@PIB_Patna) July 9, 2021
Villagers get vaccinated in #flood affected areas of #Muzaffarpur district at #टीकावालीनाव launched by @DM_Muzaffarpur@MoHFW_INDIA@BiharHealthDeptpic.twitter.com/6b9s0rmAa6
लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी केअर संस्था मदत करत आहे. संस्थेचे जिल्हा समन्वयक सौरभ तिवारी यांनी म्हटले की, त्यांचे दोन स्वयंसेवक प्रत्येक परिसरात पुढील 6 महिन्यांपर्यंत लसीकरण कामात मदत करणार आहे. लोकांना लस घेण्यास प्रेरीत करणार असल्याचं तिवारी यांनी सांगितलं. दरम्यान, गरज भासल्यास इतर पूरग्रस्त भागातही लसीकरणाची नाव चालविण्यात येईल. नावेत बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे, असेही सिव्हील सर्जन शर्मा यांनी सांगितले आहे.