विमानात सिगारेट ओढणारा बॉबी कटारिया अडचणीत; जन्मठेपेची शिक्षा होणार..?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:35 PM2022-08-16T17:35:04+5:302022-08-16T17:35:48+5:30
बॉबी कटारिया नावाच्या व्यक्तीने विमानात सिगारेट ओढून सहप्रवाशांचा जीव धोक्यात घातला होता.
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी बॉबी कटारिया नावाच्या व्यक्तीचा विमानातसिगारेट ओढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याप्रकरणी बॉबी कटारिया अडचणीत आला असून, त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी नागरी विमान वाहतूक कायद्याच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
विमानामध्ये सिगारेट ओढण्यावर बंदी असते. पण तरीही बॉबी कटारियाने कायदा आणि नियम झुगारून स्पाइसजेटच्या विमानात घाबरता सिगारेट ओढली. यासोबतच त्याने सिगारेट ओढल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. दुबईहून दिल्लीला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात हा प्रकार घडला. बॉबी कटारिया हा सोशल मीडिया इन्फ्लुएसंर असून, त्याचे इंस्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
विमानतळ DCP तनु शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी स्पाइसजेटचे लीगल सेल मॅनेजर जसबीर सिंग यांनी IGI विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, बॉबी कटारियाने 21 जानेवारी रोजी दुबईहून दिल्लीला येणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात सिगारेट ओढली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. या कृत्याने त्याने प्रवासी आणि विमान धोक्यात आणले असून आता त्याच्यावर कारवाई होणार आहे.