बोधगया होणार आध्यात्मिक राजधानी
By Admin | Published: September 6, 2015 04:10 AM2015-09-06T04:10:13+5:302015-09-06T04:10:13+5:30
बोधगया ही ज्ञानार्जनाची भूमी आहे, असे सांगून केंद्र सरकारतर्फे हे स्थळ आध्यात्मिक राजधानीच्या रूपात विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.
बोधगया : बोधगया ही ज्ञानार्जनाची भूमी आहे, असे सांगून केंद्र सरकारतर्फे हे स्थळ आध्यात्मिक राजधानीच्या रूपात विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. यामुळे भारत आणि बौद्ध जगतातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांनी येथे महाबोधी विहाराला भेट दिल्यानंतर उपरोक्त विचार मांडले. ते म्हणाले की, जगभरातील बौद्धबांधवांसाठी बोधगया हे एक श्रद्धास्थळ आहे. त्याअनुषंगाने या स्थळाचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. याशिवाय या पवित्रस्थळावरून गरजू बौद्ध राष्ट्रांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्यात येईल.
भगवान बुद्ध हे भारताच्या मुकुटातील हिरा असल्याचे सांगून बुद्ध हे केवळ हिंदुवादासाठीच नव्हे, तर साऱ्या जगाच्या दृष्टीने एक महान सुधारक आहेत आणि त्यांनी जगाला दिलेला नवा दृष्टिकोन सर्वांच्याच अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
भारतात पूजेची सर्व माध्यमे स्वीकारार्ह आहेत. हिंदुवादाचा हा गुण म्हणजे अनेक महान आध्यात्मिक गुरूंचीच देण असून, गौतम बुद्ध यात प्रमुख आहेत. या देशाला धर्मनिरपेक्षतेचा वसाही या गुरूंच्या शिकवणीमुळे प्राप्त झाला आहे, असे ते म्हणाले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधानाच्या रूपात या पवित्र स्थळाला भेट देताना आपल्याला अत्यानंद होत असल्याची भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झालेली बोधगया भेट आपल्यासाठी अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, मोदी येथील जगविख्यात बोधिवृक्षाखाली ध्यानधारणेत सहभागी झाले.
सामवेद-ग्लोबल हिंदू बुद्धिस्ट इनिशिएटिव्हद्वारे आयोजित संमेलनात बोलताना देशाने बुद्ध विचारसरणी आत्मसात केली असून, भारत हा ‘बुद्धिस्ट इंडिया’ असल्याचे त्यांनी सांगितले. समतेचा उपदेश करणारे भगवान बुद्ध महान होते, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. या परिषदेला जपान आणि भूतानचे विदेशमंत्री, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवील, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू तसेच श्रीलंका आणि नेपाळसह अनेक देशांचे मुत्सद्दी व खासदार उपस्थित होते. (वृत्तसंस्था)