बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, चौकशीचे आदेश; कटीहार नदीतही आढळले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:06:06+5:30
बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगतांना आढळले. चौसा येथील घाटावर दररोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात.
बक्सर : बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची चक्क नद्यांमध्ये विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बक्सर येथे गंगा नदीत अनेक कोरोनाग्रस्तांचे मृतदेह आढळले आहेत. तर कटीहार येथेही कटीहार नदीत काही मृतदेह आढळले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगतांना आढळले. चौसा येथील घाटावर दररोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र, सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बिहारमध्येच दोन डझनांहून अधिक रुग्णवाहिका धूळ खात पडल्याचे उघडकीस आले होते. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या खासदार निधीतून या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातून आल्याचा दावा
- जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी हात झटकण्याचा प्रयत्न केला असून हे मृतदेह उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा केला आहे.
- एसडीएम के. के. उपाध्याय यांनी सांगितले, की आमच्या येथे मृतदेहांचे दहन करण्याची परंपरा आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेशातील आहे. चौसा येथे घाटावर चौकीदार आहे. त्याच्या देखरेखीखाली मृतदेहांचे दहन करण्यात येते.
- उत्तर प्रदेशातून हे मृतदेह वाहून आले आहेत. ते रोखण्यासाठी सध्या तरी उपाय नसल्याचे उपाध्याय यांनी सांगितले.
कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नदीत फेकले
कटीहारमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची नदीत विल्हेवाट लावण्याचा प्रकार एका व्हिडिओद्वारे उघडकीस आला आहे. रुग्णवाहिकेतून कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नदीत फेकण्यात येत असल्याचे त्यात दिसत आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.