धक्कादायक ! प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून दिला जुळ्या बाळांचा मृतदेह, अंत्यसंस्कारावेळी बाळ जिवंत असल्याचं उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 04:03 PM2017-12-01T16:03:30+5:302017-12-01T16:08:51+5:30
रुग्णालयाने जिवंत बाळाला मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर जन्माला आलेली जुळी मुले मृत असल्याचं सांगत चक्क प्लास्टिकच्या पिशवीत बंद करुन सोपवण्यात आलं.
नवी दिल्ली - सात वर्षाच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर, लाखोंचं बिल लावल्यामुळे दिल्लीमधील खासगी रुग्णालयं आधीच रडारवर असून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाने जिवंत बाळाला मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर जन्माला आलेली जुळी मुले मृत असल्याचं सांगत चक्क प्लास्टिकच्या पिशवीत बंद करुन सोपवण्यात आलं. शालीमार बाग येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मॅक्स हॉस्पिटलमध्ये गुरुवारी महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामधील एक मुलगा होती तर दुसरी मुलगी. प्रसूतीदरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं. जुळ्या बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यामधील एक बाळ जिवंत असून त्याची खूप काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. बाळाला नर्सरीमध्ये ठेवण्याचा सल्ला कुटुंबाला देण्यात आला. म्हणजेच रुग्णालयाकडून भलं मोठं बिल लावण्यात आलं असतं. नेमकं काय करायचं यावर कुटुंबिय चर्चा करत असतानाच, दुस-या बाळाचाही मृत्यू झाला आहे असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.
#Delhi Visual of newborn baby who was declared dead by Max Hospital in #Delhi's Shalimar Bagh found to be alive by family later pic.twitter.com/EzaU0Ukb1m
— ANI (@ANI) December 1, 2017
रुग्णालयाने दोन्ही बाळांचा मृतदेह एका कागद आणि कपड्यात गुंडाळला, आणि चिकटपट्टी लावून एका प्लास्टिकच्या पिशवीतून नातेवाईकांकडे सोपवला. बाळांना मृत घोषित केल्यानंतर कुटुंब अंत्यसंस्कारासाठी जात असताना एक बाळ हालचाल करत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी तात्काळ काश्मीरी गेट परिसरातील रुग्णालयात धाव घेतली. तिथे बाळ जिवंत असल्याचं सांगण्यात आलं.
बाळाच्या आजोबांनी सांगितलं आहे की, 'रस्त्यात चालत असताना हालचाल होत असल्याचं लक्षात येताच आम्ही कागद फाडून पाहिलं तर आतमध्ये बाळ जिवंत असल्याचं पाहिलं. आम्ही बाळाला अग्रवाल रुग्णालयात दाखल केलं आहे'.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तक्रारीनंतरही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांनी दिल्ली मेडिकल काऊन्सिलच्या लिगल सेलकडे हे प्रकरण पाठवलं आहे. ते या प्रकरणाचा तपास करतील, त्यानंतरच गुन्हा नोंद होणार आहे. रुग्णालयाने आम्ही या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.