मंदिरातील पुजा-याकडून पत्नीच्या प्रियकराची हत्या, मंदिराच्या छतावरच जाळून टाकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 03:15 PM2017-09-28T15:15:18+5:302017-09-28T15:17:47+5:30
मंदिरातील पुजा-याने पत्नीच्या मदतीने एका 35 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. यानंतर मृतदेह दोन दिवस मंदिराच्या छतावर लपवून ठेवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी दोन दिवसानंतर आरोपी पती पत्नीने मृतदेह जाळून टाकला असल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - मंदिरातील पुजा-याने पत्नीच्या मदतीने एका 35 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. यानंतर मृतदेह दोन दिवस मंदिराच्या छतावर लपवून ठेवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी दोन दिवसानंतर आरोपी पती पत्नीने मृतदेह जाळून टाकला असल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या छतावर आग लागल्याची दिसल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. मांस जळत असल्याच्या वास असल्याने स्थानिकांना संशय आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी दांपत्याला अटक केली आहे.
'ज्याची हत्या करण्यात आली त्याचं पुजा-याच्या पत्नीसोबत अफेअर सुरु होतं. पतीला प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने आपण प्रियकराची हत्या करुन हे प्रकरण संपवू असा सल्ला दिला होता', अशी माहिती डीसीपी नुपूर प्रसाद यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी दांपत्याची ओळख पटली आहे. लखन दुबे हा गांधीनगर परिसरातील प्राचीन शिवमंदिरात पुजारी आहे. नऊ वर्षांपुर्वी त्याचं लग्न झालं होतं.
'जेव्हा आम्ही तपास सुरु केला तेव्हा आरोपी महिलेने आपले कोणतेही विवाहबाह्य संबंध नसल्याचा दावा केला होता. पण नंतर तिने आपला गुन्हा कबूल केला. प्रियकर शेखरची हत्या करुन हे प्रकरण संपवू अशी ऑफर तिने दिली होती', असं डीसीपी नुपूर प्रसाद बोलले आहेत.
प्रियकराला घरी बोलावून त्याला जाळ्यात अडकवण्याचा प्लान आखण्यात आला होता. आपला पती कामानिमित्त शहराबाहेर गेला असून, घरी आपण भेटू शकतो असं सांगत आरोपी महिलेने प्रियकराला घरी बोलावलं होतं. पण जेव्हा रविवारी शेखर घरी आला तेव्हा महिलेने मंदिराच्या छतावर नेऊन त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर महिलेने त्याच्यावर वार केले आणि नंतर पतीसोबत गळा दाबून त्याची हत्या केली. पण हत्या केल्यानंतर मृतदेहाचं काय करायचं हा प्रश्न त्यांना पडला. सकाळच्या वेळी लोकांची रहदारी आणि रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असल्याने मृतदेह नेणं कठीण झालं होतं.
मृतदेह मंदिराच्या छतावर ठेवण्यात आला होता. पण दुर्गंध सुटू लागल्याने दांपत्याची भीती वाढली. बुधवारी सकाळी दांपत्याने मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तो जाळून टाकण्यात आला. पोलिसांनी आरोपी दांपत्याला अटक केली असून त्यांनीही गुन्हा कबूल केला.