आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सायकलवरुन न्यावा लागतो मृतदेह
By admin | Published: April 19, 2017 08:32 AM2017-04-19T08:32:24+5:302017-04-19T09:53:27+5:30
आठ महिन्यांपूर्वी ओदिशामध्ये एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन न्यावा लागल्याची दुश्ये समोर आल्यानंतर अनेकजण हळहळले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
मजुली, दि. 19 - आठ महिन्यांपूर्वी ओदिशामध्ये एका आदिवासी व्यक्तीला रुग्णवाहिका नाकारल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागला होता. ह्दय हेलावून टाकणा-या या घटनेचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकजण हळहळले होते. आता अशीच एक घटना आसाममध्ये समोर आली आहे. खुद्द आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांच्या माजुली मतदारसंघात वाहन चालवण्यायोग्य रस्ते नसल्याने एका व्यक्तीला आपल्या 18 वर्षीय भावाचा मृतदेह सायकलवरुन न्यावा लागला. स्थानिक वृत्तवाहिनीने ही दृश्ये प्रसारीत केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
स्थानिक अधिका-यांनी या घटनेसंबंधी माहिती देताना सांगितले कि, डींपल दास असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते लखीमपूर जिल्ह्यातील बालीजान गावचे रहिवासी होते. दास यांना श्वसानाचा त्रास होत असल्याने सोमवारी पहाटे 3.30च्या सुमारास सहाजण त्यांना सायकलवरुन जोरहाट जिल्ह्यातील गारामुर येथील सिव्हील रुग्णालयात घेऊन आले. तिथे डॉक्टर डींपल दास यांच्यावर उपचार करत असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर रुग्णालयाने दास यांचा मृतदेह घरी पाठवण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. पण रुग्णवाहिकेचा चालक येण्याआधीच दास यांच्या नातलगांनी त्यांचा मृतदेह सायकलला बांधला व तिथून निघून गेले अशी माहिती सिव्हील रुग्णालयाचे अधीक्षक मानिक मिली यांनी दिली.
दास रहात असलेले बालीजान गाव लखीमपूर जिल्ह्यात येते आणि गारामुर येथील सिव्हील रुग्णालय जोरहट जिल्ह्यात आहे. बालीजान गावात वाहन चालवण्यायोग्य रस्ते नाहीत. तिथे राहणा-या नागरीकांना गारामुर येथे येण्यासाठी बांबूचा ब्रिज ओलांडावा लागतो अशी माहिती माजुलीचे पोलिस उपायुक्त पी.जी. झा यांनी दिली.
Majuli (Assam): Man carries body of his 18 year old brother on a bicycle due to absence of a motorable road in the area. pic.twitter.com/y04Y9AtVGD
— ANI (@ANI_news) April 19, 2017