गंगा नदीजवळ वाळूत मृतदेह पुरल्याचा प्रकार, उन्नावमधील घटनेची चौकशी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:23 AM2021-05-14T05:23:50+5:302021-05-14T05:24:54+5:30
उन्नावचे जिल्हादंडाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, ‘काही लोक मृतदेहांना जाळत नाहीत, तर नदीजवळील वाळूत पुरतात. मला मृतदेहांबद्दल समजल्यानंतर मी तेथे अधिकारी पाठवले. त्यांना चौकशी करण्यास सांगितले असून, आम्ही नंतर कारवाई करू.’
उन्नाव (उत्तर प्रदेश) : उन्नाव जिल्ह्यात गंगा नदीजवळ दोन ठिकाणी वाळूत अनेक मृतदेह पुरल्याचे आढळले आहेत. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत संशयित कोविड-१९ रुग्णांचे मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर ताजा प्रकार उघडकीस आला. आधी सापडलेले मृतदेह हे कोरोनाबाधितांचे होते का, याला जसा दुजोरा मिळाला नाही, तसाच तो वाळूत पुरलेल्या मृतदेहांबाबतही नाही.
उन्नावचे जिल्हादंडाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, ‘काही लोक मृतदेहांना जाळत नाहीत, तर नदीजवळील वाळूत पुरतात. मला मृतदेहांबद्दल समजल्यानंतर मी तेथे अधिकारी पाठवले. त्यांना चौकशी करण्यास सांगितले असून, आम्ही नंतर कारवाई करू.’ हे मृतदेह भगव्या कापडात गुंडाळलेले होते व हाजीपूर भागात रौतापूर गंगा घाटापाशी ते पुरल्याचे आढळले होते. मृतदेह नदीच्या काठांवर पुरले जात असल्याचे आढळल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
स्थानिक व्यावसायिक शिरीष गुप्ता म्हणाले, ‘पावसाळा अवघ्या महिन्यावर आला असून, गंगा नदीला पूर येऊ लागेल तेव्हा हे मृतदेह किनाऱ्यावर वाहत येतील. जिल्हा प्रशासनाने हे मृतदेह तेथून काढून त्यांच्यावर रीतसर अंत्यसंस्कार करावेत.’ हे प्रकरण गंभीर असल्यामुळे अधिकाऱ्यांना ही सूचना पटत नाही. मृतदेह वर काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे अधिकारी म्हणाला.