कॉलेजच्या शौचालयात संशयास्पद परिस्थितीत आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह, आत्महत्या नसल्याची पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 12:44 PM2017-10-09T12:44:39+5:302017-10-09T15:47:17+5:30
कॉलेजच्या शौचालयात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. दक्षिण-पूर्व बंगळुरुमधील बेलंदूर येथील कॉलेजमध्ये हा मृतदेह आढळला
बंगळुरु - कॉलेजच्या शौचालयात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. दक्षिण-पूर्व बंगळुरुमधील बेलंदूर येथील कॉलेजमध्ये हा मृतदेह आढळला. शनिवारी रात्रीची ही घटना आहे. मृत तरुण पीयूसीचा विद्यार्थी होती. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
सार्थक पुराणिक असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो धारवाडचा राहणारा होता. श्री चैतन्य पीयू कॉलेजमध्ये तो शिकत होता. रात्री 7.30 वाजता सार्थक टॉयलेटमध्ये गेला होता. जवळपास अर्धा तास झाला तरी सार्थक परतला नाही म्हणून त्याच्या मित्रांना शंका आली. त्यांनी टॉयलेटमध्ये जाऊन पाहिलं असता, तिथे सार्थक बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याचं दिसलं. यानंतर त्याच्या मित्रांनी तात्काळ कॉलेज प्रशासनाला याबाबत माहिती दिली. सार्थकला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तिथे पोहोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात आणण्याच्या एक तास आधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सार्थकच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहात आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे.
सेंट जॉन हॉस्पिटलमध्ये रविवारी पोस्टमॉर्टम करण्यात आला. त्यानंतर सार्थकचा मृतदेह त्याचे वडिल श्रीकांत पुराणिक आणि आई सुचेंद्रा पुराणिक यांच्याकडे सोपवण्यात आला. दोघेही व्यवसायिक आहेत. सार्थकने दोन वर्षांपुर्वी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. जवळच असणा-या कॉलेज हॉस्टेलमध्ये तो राहायचा. 'ही आत्महत्या असण्याची शक्यता फार कमी आहे. आम्ही फॉरेन्सिकच्या अहवालाची वाट पाहत आहोत. सार्थकच्या आई-वडिलांनी कॉलेज प्रशासन किंवा इतर कोणाविरोधातही कोणता आरोप केलेला नाही', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.