CoronaVirus News: अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने घरातच पुरला मृतदेह; लोकांनी मदत न केल्याचा कुटुंबाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:35 PM2020-05-25T23:35:59+5:302020-05-25T23:36:29+5:30

बिहारमधील धक्कादायक घटना; लॉकडाऊनमुळे कुटुंब झाले बेकार

 The body was buried in the house as there was no money for the funeral | CoronaVirus News: अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने घरातच पुरला मृतदेह; लोकांनी मदत न केल्याचा कुटुंबाचा आरोप

CoronaVirus News: अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने घरातच पुरला मृतदेह; लोकांनी मदत न केल्याचा कुटुंबाचा आरोप

Next

पाटणा : अंत्यसंस्कारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे एका कचरावेचकाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी स्वत:च्या घरात खड्डा खणून दफन केल्याची घटना बिहारमधील भागलपूर शहरामध्ये घडली. लॉकडाऊनमुळे हा कचरावेचक बेकार झाला होता व त्यामुळे गेले काही दिवस त्याला व त्याच्या कुटुंबाला अर्धपोटी राहावे लागत होते. अपस्माराच्या झटक्याने हा कचरावेचक शुक्रवारी रात्री मरण पावला.

अतिशय धक्कादायक अशा या घटनेतील दुर्दैवी जिवाचे नाव गुड्डू मंडल (३० वर्षे), असे आहे. त्याचे दोन धाकटे भाऊ ओमप्रकाश व अजय हे सायकलरिक्षा चालवतात. लॉकडाऊनने या दोघांचाही रोजगार हिरावून नेला आहे.

गुड्डूचा भाचा नीरजने सांगितले की, गुड्डूच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याची इच्छा असूनही त्यासाठी लागणारे पुरेसे पैसे आमच्याकडे नव्हते. त्यामुळे काही श्रीमंत लोकांकडे आम्ही पैसे मागायला गेलो, तर त्यांनी हाकलून दिले. अशा स्थितीत काहीच पर्याय न उरल्याने गुड्डूचे पार्थिव आम्ही घरातच खड्डा खणून त्यात दफन केले.गुड्डू हा हिंदूधर्मीय होता.

बिहारमध्ये या धर्मातील एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याच्या मृतदेहाला शेवटची आंघोळ व नंतर नवीन कपडे घातले जातात. त्यासाठीही गुड्डूच्या कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. गुड्डू कचरावेचक किंवा मजूर म्हणून काम करून रोज १०० ते २०० रुपये कमवायचा. लॉकडाऊनमध्ये तो बेकार झाला व पोट भरण्यासाठी चक्क भीक मागू लागला. त्याची बायको त्याला काही वर्षांपूर्वीच सोडून गेली आहे. गुड्डूच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह घरातच पुरला आहे ही खबर शेजारपाजारच्या लोकांनी पोलिसांना दिली.

अमली पदार्थांचे होते व्यसन

इशाचक पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी एस. के. सुधांशू यांनी सांगितले की, गुड्डूचा त्याच्या घरात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला अमली पदार्थांचेही व्यसन होते. त्याच्या मृतदेहावर जखमा आढळून आलेल्या नाहीत. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

भागलपूरचे जिल्हाधिकारी प्रणवकुमार यांनी सांगितले की, कुटुंबीयांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे गुड्डूच्या कुटुंबीयांनी स्थानिक प्रशासनाला कळविले असते तर गुड्डूच्या अंत्यसंस्काराची सोय झाली असती. लोकांनी मदत केली नाही या गुड्डूच्या कुटुंबीयांच्या दाव्यावर विश्वास बसणे कठीण आहे.

Web Title:  The body was buried in the house as there was no money for the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.