काळाने घात केला...मिस्टर इंडिया राहिलेला प्रेमराज अरोडाचा हार्ट अटॅकनं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 03:36 PM2023-05-24T15:36:45+5:302023-05-24T15:37:50+5:30
प्रेमराजला कुठलाही आजार नव्हता. परंतु मध्ये मध्ये एसिडिटी समस्या जाणवत होती. रविवारी सकाळी दादाने एसिडिटी होत असल्याने औषध घेतले होते.
कोटा - देशातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर प्रेमराज अरोडाचा आकस्मित मृत्यूने झाल्याने क्रिडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. वयाच्या ४२ व्यावर्षी प्रेमराजने अखेरचा श्वास घेतला. प्रेमराज अरोडाला ग्रॅस्ट्रिकचा त्रास असल्याने त्याच्या छातीत दुखत होते. कुटुंबाने प्रेमराजला तातडीने हॉस्पिटलला उपचारासाठी नेले परंतु त्याआधीच प्रेमराजचा मृत्यू झाला. हॉस्पिटलला घेऊन जाताना २० मिनिटांआधीच प्रेमराजचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
प्रेमराज अरोडा याला बॉडिबिल्डिंगसोबतच समाजसेवेची आवड होती. अरोडा समाज संस्थेचा तो अध्यक्ष होता. कोटामध्ये प्रेमराज यांच्या ३ जीम होत्या. शहरात अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे तो आयोजन करायचा. अनेक बक्षिस जिंकलेला प्रेमराज हा मिस्टर इंडियाही राहिला होता. प्रेमराजच्या कुटुंबात आई वडील, भाऊ बहीण, बायको आणि ३ मुले असा परिवार आहे. ज्यात २ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
प्रेमराज अरोडाचा छोटा भाऊ राहुलने सांगितले की, १९९३ पासून दादाने जिमिंगला सुरुवात केली होती. स्टेट लेवल आणि सिटी लेवल स्पर्धेत तो भाग घ्यायचा. दादाने जिंकलेली बक्षिसे त्याच्या रूममध्ये भरली आहेत. मिस्टर कोटा, मिस्टर हाडोती राहिला होता. पॉवर लिफ्टिंगमध्ये पाऊल ठेवल्यानंतर २०१६ ते २०१८ या काळात मिस्टर राजस्थानचा खिताब जिंकून तो गोल्ड मेडलिस्ट राहिला होता. मिस्टर इंडियाही असल्याने संपूर्ण देशात त्याचे नाव होते.
प्रेमराजला कुठलाही आजार नव्हता. परंतु मध्ये मध्ये एसिडिटी समस्या जाणवत होती. रविवारी सकाळी दादाने एसिडिटी होत असल्याने औषध घेतले होते. त्यानतर त्याची तब्येत बिघडली. जेव्हा आम्ही त्याला हॉस्पिटलला नेले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रेमराजदादा नेहमी लोकांना नशेपासून दूर राहण्याचा सल्ला द्यायचा. लोकांनी फिट राहावे यासाठी त्याचे प्रयत्न होते. अलीकडेच त्याने नवीन जीम उघडली होती असं भाऊ राहुलने सांगितले.