‘बोफोर्स’ हा मीडिया ट्रायल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2015 02:00 AM2015-05-27T02:00:40+5:302015-05-27T02:00:40+5:30
बोफोर्स घोटाळा ही ‘एक मीडिया ट्रायल’ होती आणि बोफोर्स कंपनीकडून हॉवित्झर तोफांच्या खरेदीच्या त्या सौद्यात गैरव्यवहार झाल्याचा निकाल देशातील कोणत्याही न्यायालयाने अद्याप दिलेला नाही.
राष्ट्रपतींचा निर्वाळा : गैरव्यवहार नाही
नवी दिल्ली : बोफोर्स घोटाळा ही ‘एक मीडिया ट्रायल’ होती आणि बोफोर्स कंपनीकडून हॉवित्झर तोफांच्या खरेदीच्या त्या सौद्यात गैरव्यवहार झाल्याचा निकाल देशातील कोणत्याही न्यायालयाने अद्याप दिलेला नाही. प्रसिद्धिमाध्यमांनी या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्धी देऊन त्याचा उगाच बाऊ केला आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. स्वीडन दौऱ्यापूर्वी स्वीडनमधील एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुखर्जी यांनी हे मत व्यक्त केले.
‘बोफोर्स सौद्यात कुठलाही घोटाळा झाला नाही, हे मी सर्वप्रथम स्पष्ट करायला हवे, असे सांगून मुखर्जी म्हणाले, ‘बोफोर्स व्यवहार झाल्यानंतर काही वर्षांनी मी संरक्षणमंत्री बनलो आणि भारताला मिळालेली ही सर्वोत्तम तोफ असल्याची पावती माझ्या सर्व जनरल्सनी त्या वेळी दिलेली होती. भारतीय लष्कर आजतागायत या बोफोर्स तोफा वापरत आहे. ज्या तथाकथित घोटाळ्याबद्दल तुम्ही बोलत आहात त्याबाबतची चर्चा अर्थातच मीडिया करीत असते. मीडियाने त्याला अवाजवी प्रसिद्धी दिली. ती मीडिया ट्रायल होती. एवढी प्रसिद्धी कुणाला देऊ नये असे मला वाटते.’
‘बोफोर्स तोफा चांगल्या आहेत, असे प्रमाणपत्र मी देऊ शकतो. परंतु राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. तुम्ही बोफोर्सच्या दर्जाबाबत मला विचारत असाल तर मी एवढेच सांगेन की या तोफा सर्वोत्कृष्ट आहेत,’ असे पर्रीकर यांनी पत्रकारांना सांगितले.