बोगस ‘क्लेम’ भोवणार
By admin | Published: July 17, 2014 02:45 AM2014-07-17T02:45:18+5:302014-07-17T02:45:18+5:30
नियमात बसत नसूनही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सुटीकालीन प्रवास भत्त्याचा (एलटीए) वापर परदेशी प्रवासासाठी केला आहे,
मुंबई / नवी दिल्ली : नियमात बसत नसूनही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सुटीकालीन प्रवास भत्त्याचा (एलटीए) वापर परदेशी प्रवासासाठी केला आहे, तसेच हा भत्ता प्राप्त करून घेण्यास बनावट बिले दिली आहेत, अशा कर्मचाऱ्यांना आगामी दोन एलटीए क्लेम न देण्याची व त्यांची विभागीय चौकशी करण्याची घोषणा कार्मिक मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केली आहे.
लोकसभेत या संदर्भात उपस्थित झालेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तराद्वारे त्यांनी ही धोरणात्मक भूमिका जाहीर केली. नियमबाह्य पद्धतीने सरकारी कर्मचारी एलटीए क्लेम घेत असून, केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर विभाग याची चौकशी करीत असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने २० जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध केले होते.
उपलब्ध माहितीनुसार, दक्षता आयोगाने याचा विस्तृत अहवाल तयार केला आहे. यामध्ये कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य व बनावट एलटीए क्लेम केला याची यादी व त्याची कार्यपद्धती (मोडस ओपरेन्डी) अशी माहिती कॅबिनेट सचिवांना सादर केली. या अनुषंगाने संसदेतही प्रश्नाची विचारणा झाली होती. त्यावर केंद्रीय कार्मिक मंत्र्यांनी दखल घेत अशा कर्मचाऱ्यांना दोन क्लेम न देण्याची धोरणात्मक भूमिका घेतली आहे. त्यांना चालू आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच अशा कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीचेही आदेश दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)