बोगस मतदानाचे दावे! दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:30 IST2025-02-06T09:30:25+5:302025-02-06T09:30:53+5:30

Delhi Vidhan Sabha Election 2025: आमच्याकडे पुरेशा प्रमाणात अतिरिक्त ईव्हीएम आहेत. अधिकाऱ्यांसह एक मजबूत तांत्रिक टीम ईव्हीएमशी संबंधित समस्या तातडीने सोडवत आहे.

Bogus voting claims! AAP-BJP make allegations and counter-allegations in Delhi Assembly elections | बोगस मतदानाचे दावे! दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप

बोगस मतदानाचे दावे! दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप

-चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत बुधवारी मतदान सुरू असताना बोगस मतदान झाल्याचा आरोप भाजप आणि आम आदमी पार्टी यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दुपारी सांगितले की, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. ‘मॉक पोल’ आणि प्रत्यक्ष मतदानादरम्यान काही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) बदलण्यात आल्या आहेत. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात अतिरिक्त ईव्हीएम आहेत. अधिकाऱ्यांसह एक मजबूत तांत्रिक टीम ईव्हीएमशी संबंधित समस्या तातडीने सोडवत आहे.

सीलमपूरमध्ये भाजप नेत्याने बुरखा घातलेल्या काही महिलांवर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र, पोलिसांनी या परिसरात कोणत्याही प्रकारचे बोगस मतदान झाल्याचा इन्कार केला आहे. भाजपच्या बोगस मतदानाच्या आरोपानंतर आपच्या नेत्यांनी सीलमपूरमधील मतदान केंद्राबाहेर घोषणाबाजी सुरू केली. 

आप नेते मनीष सिसोदिया यांनी जंगपुरा येथील घरातून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला. सोशल मीडियावर या कथित कृत्याचा व्हिडीओही शेअर केला.

६९९ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद

दिल्ली विधानसभेची निवडणूक संपन्न झाली असून, ६९९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यात मुख्यमंत्री आतिशी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल, प्रवेश वर्मा आणि विजेंद्र गुप्ता प्रमुख आहेत. 

दिल्लीतील १ कोटी ५६ लाख १४ हजार मतदारांनी सत्तेची किल्ली कुणाच्या हाती दिली हे ८ फेब्रुवारी रोजी निकालातून स्पष्ट होईल. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री आतिशी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.

आप : लोकांना मतदान करण्यापासून रोखले

ग्रेटर कैलाशमधील आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी दावा केला की, पोलिसांनी चिराग दिल्ली परिसरात बॅरिकेट्स लावले आहेत आणि लोकांना मतदान करण्यापासून रोखले जात आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

भाजप : कार्यकर्त्याच्या झोपडीला आग लावली

भाजपच्या दिल्ली शाखेने एका पोस्टमध्ये आरोप केला की, शाहदरा विधानसभा मतदारसंघातील कलंदर कॉलनीमध्ये आप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या झोपडीला आग लावली.

Web Title: Bogus voting claims! AAP-BJP make allegations and counter-allegations in Delhi Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.