स्नॅक्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 03:21 PM2021-12-26T15:21:49+5:302021-12-26T15:22:05+5:30
बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एका स्नॅक्सच्या फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला.
पटना:बिहारमधील मुझफ्फरपूर येथील स्नॅक्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 6-7 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी बेला औद्योगिक परिसरातील मोदी कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर एसपी-डीएमसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात 1 डझनहून अधिक लोक काम करत होते. मंडळ अधिकारी सुधांशू शेखर यांनी या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. जोरदार स्फोटानंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले आणि मदत-बचाव कार्य सुरू केले.
नूडल्स कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या फॅक्टरीत हा स्फोट झाला तिथे नूडल्स बनवले जात होते. या स्फोटात नूडल्सचा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या इतर अनेक कारखान्यांचेही नुकसान झाले आहे. मुझफ्फरपूरचे एसएसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना सदर हॉस्पिटल आणि SKMCH मध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.