“शाहरूख खाननं ठेवलं माझ्या मोठ्या मुलीचं नाव, कुटुंबाशी ३० वर्षांपासूनच नातं”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 08:15 PM2023-02-06T20:15:54+5:302023-02-06T20:17:24+5:30
महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची माहिती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देत देश कशाप्रकारे पुढे जात आहे याची झलक यातून दिसत असल्याचं म्हटलं. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींचा अर्थसंकल्प हा भविष्याचा अर्थसंकल्प असल्याचे सिद्ध करतो. पायाभूत सुविधांतर्गत जेव्हा रस्ते आणि विमानतळ बांधले जातील, तेव्हा आजच्याच नव्हे, तर १०-१५ वर्षांनंतरही देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील, असं त्या म्हणाल्या.
आजतक कार्यक्रमात स्मृती इराणी या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी शाहरुख खानसोबतच्या आपल्या कौटुंबीक नात्याबाबतही वक्तव्य केलं. स्मृती इराणींना पठाण चित्रपट आणि बॉयकॉट बद्दल प्रश्न विचारण्यात आला. “लोकांना कदाचित माहित नसेल की माझ्या मोठ्या मुलीचे नाव शाहरुख खाननं ठेवलं आहे. माझे पती आणि शाहरुखची ३० वर्षे जुनी मैत्री आहे. त्यामुळे जे काही सांगितलं जात आहे ते पूर्ण सत्य नाही. कलाकाराचा आजही आदर केला जातो. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर भाष्य करणे योग्य होणार नाही,” असं यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या.
मर्यादेत राहून विरोध करा
फ्रीडम सर्वात जवळचे आहे, त्याबाबत पक्षपात होता कामा नये, असंही त्या म्हणाले. कुणाला काही पटत नसेल तर मर्यादेत राहून निषेध केला पाहिजे. काँग्रेसमध्ये असे नेते आहेत, ज्यांनी महिलांबद्दल असभ्य टिप्पण्या केल्या आणि राहुल गांधी तसंच सोनिया गांधींनी त्यांचा प्रचार केला. आजच्या तारखेला प्रेक्षकांकडे अनेक पर्याय आहेत, तो मल्टिप्लेक्सपेक्षा कमी किंमतीत OTT वर गोष्टी पाहू शकतो. म्हणूनच जर कंटेंट चांगला असेल तर लोक तो बघायला नक्कीच येतील. चित्रपटाच्या अपयशाचा संबंध केवळ बॉयकॉट टोळीशी जोडता कामा नये, असंही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं.