रियानेच सुशांतसिंह राजपूतला केले व्यसनासाठी प्रवृत्त, एनसीबीकडून आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 06:05 AM2022-07-14T06:05:24+5:302022-07-14T06:05:52+5:30
सुशांतसिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थांच्या व्यसनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप रिया चक्रवर्तीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ठेवला आहे. सुशांतसिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात, एनसीबीने या प्रकरणातील ३५ आरोपींविरुद्ध एकूण ३८ आरोप दाखल केले आहेत. एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत विशेष न्यायालयापुढे सादर केलेल्या मसुद्यात आरोपींवरील आरोपांची तपशिलात माहिती दिली आहे.
रिया चक्रवर्तीवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा केला आहे, असे एनसीबीने मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपींनी अमली पदार्थांच्या तस्करीला वित्तपुरवठा केला. गांजा, चरस, कोकेन आणि इतर अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन मुंबई महानगर प्रदेशात वैध परवाना व परवानगी नसताना केले. सर्व आरोपींनी मार्च २०२० ते त्यावर्षी डिसेंबर दरम्यान एकमेकांसोबत किंवा गटांमध्ये उच्चभ्रू आणि बॉलीवूडमध्ये ड्रग्जची खरेदी, खरेदी-विक्री आणि वितरण करण्यासाठी गुन्हेगारी कट रचला, असे मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे.
त्यामुळे, त्यांच्यावर कलम २७ आणि २७ (अ) (अवैध वाहतुकीला वित्तपुरवठा करणे आणि गुन्हेगारांना आश्रय देणे) २८ सह एनडीपीएस कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. रियाचा भाऊ शौविक ड्रग्ज तस्करांच्या नियमित संपर्कात होता आणि त्याला सहआरोपींकडून अनेकवेळा अमली पदार्थांचा पुरवठा करण्यात आला, असे मसुद्यात म्हणण्यात आले आहे.
एनसीबी म्हणते...
आरोपाच्या मसुद्यात रियाबाबत एनसीबीने म्हटले आहे की, रिया चक्रवर्तीला सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती व दीपेश सावंत हे गांजाची डिलिव्हरी करत असत आणि हा गांजा सुशांतला देण्यात येत असे.