बॉलिवूडच्या कलाकारांनीही लावली आहे लोकसभेमध्ये हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:00 AM2019-03-26T01:00:55+5:302019-03-26T01:01:28+5:30
दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणावर तेथील चित्रपटसृष्टीचा प्रचंड प्रभाव आहे, अनेक कलाकार तेथील राजकारणात सक्रिय आहेत, असे सततत सांगण्यात येत असते.
नवी दिल्ली : दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणावर तेथील चित्रपटसृष्टीचा प्रचंड प्रभाव आहे, अनेक कलाकार तेथील राजकारणात सक्रिय आहेत, असे सततत सांगण्यात येत असते. पण हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारही राजकारणात आले आणि ते लोकसभेवर निवडूनही आले, असे दिसून येते. मात्र पहिला अभिनेता लोकसभेवर गेला, तो मात्र होता दक्षिणेकडील राज्यातलाच.
आंध्र प्रदेशातील ओंगोल मतदारसंघातून १९६७ साली काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले ते तेलगू अभिनेते होते कोंगरा जग्गय्या. त्यानंतरच्या अनेक निवडणुकांद्वारे चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार लोकसभेवर निवडून गेले.
अभिनेते सुनील दत्त वायव्य मुंबईतून १९८४ साली लोकसभेवर निवडून गेले. त्या मतदारसंघाचे त्यांनी पाच वेळा प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या पत्नी नर्गिस दत्त याही खासदार होत्या. पण त्या राज्यसभा सदस्य होत्या. वैजयंती माला याही १९८४ साली मद्रास (आता चेन्नई) दक्षिण मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्याचवर्षी अमिताभ बच्चन हेही अलाहाबादमधून काँग्रेसतर्फे विजयी झाले. त्यांनी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता. त्यांच्या पत्नीही खासदार आहेत. पण राज्यसभा सदस्य असलेल्या जया बच्चन या समाजवादी पक्षात आहेत.
दूरदर्शनवरील रामायण मालिकेतील सीता म्हणजे दीपिका चिखलिया व रावण म्हणजे अरविंद त्रिवेदी १९९१ साली अनुक्रमे बडोदा व साबरकांठामधून भाजपातर्फे निवडून आले होते. तेव्हा राम मंदिर हा मुद्दा भाजपाने जोरात लावून धरला होता. महाभारत या मालिकेतील कृष्ण म्हणजे नितीश भारद्वाज हेही १९९६ साली जमशेदपूरमधून निवडून आले होते.
राजेश खन्ना यांनी १९९२ ते १९९६ या काळात नवी दिल्ली मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी तेव्हा भाजपाच्या शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला होता. मात्र १९९१ साली राजेश खन्ना यांचा भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १५८९ मतांनी पराभव केला होता. विनोद खन्ना भाजपातर्फे पंजाबच्या गुरूदासपूरमधून तीनदा निवडून आले होते आणि ते केंद्रात मंत्रीही होते. शत्रुघ्न सिन्हा भाजपातर्फे बिहारच्या पाटणासाहिबमधून १९९९ व
२0१४ साली निवडून आले. तेही केंद्रात
मंत्री होते. पण बंडखोरी करणाऱ्या सिन्हा
यांना यंदा भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षातर्फे उभे राहणार, हे स्पष्ट नाही.
राज बब्बर हे दोनदा समाजवादी पार्टीतर्फे तर एकदा काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशातून निवडून आले. ते यंदाही काँग्रेसचे उमेदवार आहेत. अभिनेत्री जया प्रदा दोनदा समाजवादी पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेल्या. पण २0१४ साली त्या पराभूत झाल्या. यंदा त्या रिंगणात नाहीत. गोविंदा २00४ साली काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून निवडून आले होते. धर्मेंद्र हे २00४ साली राजस्थानमधून भाजपातर्फे लोकसभेत गेले होते. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी याही भाजपातर्फे २0१४ साली मथुरातून निवडून आल्या. त्या यंदाही निवडणूक लढवत आहेत.
याखेरीज परेश रावल (गुजरात), किरण खेर (चंदीगड), मनोज तिवारी (दिल्ली) व गायक बाबुल सुप्रियो हेही २0१४ साली भाजपातर्फे लोकसभेवर निवडून गेले. अभिनेत्री मूनमून सेन या बंगालमधून तृणमूल काँग्रेसतर्फे निवडून गेल्या. यंदाही त्या रिंगणात आहे. याखेरीज अन्य पक्षांतर्फे यंदाही काही कलाकार निवडणूक लढवत आहेत.
पराभूत सेलिब्रिटी
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, दिग्दर्शक मुझफ्फर अली, नफिसा अली, शेखर सुमन, गुल पनाग, जॉय बॅनर्जी, जावेद जाफ्री, महेश मांजरेकर, राखी सावंत यांचा समावेश आहे. पराभूत होऊ नही भाजपाने स्मृती इराणी यांना मंत्री केले. त्या यंदाही अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.