मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 06:50 PM2018-05-04T18:50:56+5:302018-05-04T18:52:03+5:30

प्रकाश राज पुन्हा पंतप्रधान मोदींवर बरसले

Bollywood Has Stopped Giving me Role Since I Started Speaking Out Against Narendra Modi says Prakash Raj | मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

मुंबई: पंतप्रधान मोदींवर टीका करायला लागल्यापासून बॉलीवूडनं मला चित्रपटाच्या ऑफर्स देणं थांबवलं, असं अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटलंय. जेव्हापासून मी मोदी आणि भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलीय, तेव्हापासून मला बॉलीवूडमधून चित्रपट मिळत नसल्याचा आरोप प्रकाश राज यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचा खून करण्यात आल्यानंतर राज यांनी मोदी आणि भाजपवर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. तेव्हापासून ते सातत्यानं भाजपच्या विरोधात भूमिका घेताहेत. 

'गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी पहिल्यांदा पंतप्रधान मोदींविरोधात भूमिका घेतली होती. तेव्हापासून मला बॉलीवूडनं बाजूला टाकलंय. दक्षिण भारतात कोणतीही समस्या नाही. मात्र बॉलीवूडमधून चित्रपटाच्या ऑफर येणं बंद झालंय,' असं राज 'द प्रिंट'शी बोलताना म्हणाले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गौरी लंकेश यांची बंगळुरूत हत्या करण्यात आली होती. काही अज्ञातांनी लंकेश यांच्या घराबाहेर त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी विशेष तपास पथकानं एकाला अटक केली होती. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. 

गौरी लंकेश आणि प्रकाश राज यांच्यात अनेक वर्षांपासून चांगली मैत्री होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे प्रकाश राज अतिशय अस्वस्थ झाले होते. यावेळी प्रकाश राज यांनी भाजपावर थेट हल्ला केला. 'गौरी लंकेश प्रश्न विचारत होत्या. त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हापासून मी स्वत:लाच दोषी मानू लागलो. लंकेश यांच्या संघर्षात आपण त्यांना एकटं सोडलं होतं का? याबद्दल मी जितके प्रश्न विचारतो, तितके मला गप्प करण्याचे प्रयत्न होतात. मला धमक्या दिल्या जातात आणि हे भाजपाकडून केलं जातंय,' असं प्रकाश राज यांनी म्हटलंय. 
 

Web Title: Bollywood Has Stopped Giving me Role Since I Started Speaking Out Against Narendra Modi says Prakash Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.