ज्या नमाजामुळे लोकांना त्रास होतो, तो नमाज योग्य नाही- सोनू निगम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 10:03 PM2018-12-26T22:03:33+5:302018-12-26T22:05:26+5:30
उद्यानातील नमाजावर सोनू निगमचं परखड भाष्य
मुंबई: उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका उद्यानात केल्या जाणाऱ्या नमाज पठणावर प्रशासनानं बंदी घातल्यानंतर यावरुन राजकारण तापलं. या मुद्द्यावरुन विविध राजकीय पक्षांकडून विधानं केली जात आहेत. याआधी अजानच्या आवाजावर टीका करणाऱ्या गायक सोनू निगमनंदेखील यावर भाष्य केलं आहे. ज्या ठिकाणच्या नमाजामुळे लोकांना त्रास होतो, तो नमाज योग्य नाही, असं सोनू निगमनं म्हटलं आहे.
हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'च्या एका कार्यक्रमात सोनू निगम सहभागी झाला होता. यावेळी उत्तर प्रदेशातील नोएडामधील घटनेवर सोनूनं आपलं मत व्यक्त केलं. 'रस्त्यावर गोंधळ घालण्याला मी धर्म मानत नाही. जे चूक आहे, ते चूकच आहे आणि ते बंद करायला हवं. कायदा सर्वांसाठी समान आहे,' असं सोनू म्हणाला. कोणताही धर्म हे करत असला तरी जे चूक आहे ते चूकच असेल, असंदेखील तो म्हणाला.
'सार्वजनिक ठिकाणं ही जनतेची असतात. त्या ठिकाणी हिंदू जातात, मुस्लिम जातात आणि नास्तिकदेखील जातात. त्या ठिकाणी धर्माला मानणारे जातात आणि धर्म न मानणारेही जातात. मग एका धर्माला उद्यान कसं काय दिलं जाऊ शकतं?' असा सवाल त्यानं उपस्थित केला. आम्ही फार आधीपासून उद्यानात नमाज पठणाला येतो असा स्थानिकांचा दावा आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न सूत्रसंचालकानं सोनूला विचारला. यावर सती प्रथा पण फार पूर्वीपासून सुरू होती. बालविवाहची प्रथादेखील अतिशय आधीपासून सुरू होती, असं सोनू म्हणाला. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. फक्त लोकांनी थोडं सजग व्हायला हवं, असं आवाहन त्यानं केलं.