विमानतळावर बॉम्ब; संशयित शरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 04:44 AM2020-01-23T04:44:18+5:302020-01-23T04:44:44+5:30
मंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब पेरणाऱ्या संशयित व्यक्तीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे.
मंगळुरू : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब पेरणाऱ्या संशयित व्यक्तीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. तो मणिपालचा असून, त्याचे नाव आदित्य राव (३६), असे आहे. त्याने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा गुन्हा कबूल केला आहे.
पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या कार्यालयात संशयित आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. नंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेºयाने टिपलेल्या त्यावेळच्या दृश्यातील व्यक्तीसारखा तो दिसतो.
दरम्यान, मंगळुरू पोलीस अधिका-यांचे एक पथकाही संशयिताची चौकशीसाठी दाखल झाले आहे. संशयित आदित्य राव याला चौकशीसाठी बंगळुरूच्या हलसूर गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तो अभियांत्रिकीत पदवीधर असून एम.बी.ए. आहे.
मंगळुरूचे पोलीस आयुक्त पी.एस. हर्षा यांनी टष्ट्वीट केले की, पोलीस अधिकाºयांचे पथक त्याची चौकशी करणार आहे. नंतर पुढील कारवाई ठरविली जाईल. राव याला २०१८ मध्येही बंगळुरू विमानतळावर बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षारक्षकाच्या नोकरीसाठी काही कागदपत्रे नसल्याने त्याला नाकारण्यात आले होते. त्याचा बदला घेण्यासाठी असे केल्याचे त्याने सांगितले. नोकरीच्या शोधात तो २०१२ मध्ये बंगळुरूला आला होता. त्याने एका खाजगी बँकेत नोकरीही केली; नंतर या नोकरीचा राजीनामा दिला होता. तो पुन्हा मंगळुरूला गेला. तेथे सहा महिने सुरक्षारक्षकाचे काम केले. नंतर उडुपीमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केले.