मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:50 PM2024-05-06T12:50:01+5:302024-05-06T12:51:04+5:30

पश्चिम बंगालमधील हुगळीत एक मोठी दुर्घटना घडली. हुगळीच्या पांडुआ येथे झालेल्या ब्लास्टमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन लहान मुलं जखमी झाली आहेत.

bomb blast in hooghly west bengal minor killed lok sabha election 2024 | मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी

फोटो - ABP AI

पश्चिम बंगालमधील हुगळीत सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. हुगळीच्या पांडुआ येथे झालेल्या ब्लास्टमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन लहान मुलं जखमी झाली आहेत. मुलांनी खेळताना बॉल समजून बॉम्ब उचलला, असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर बॉम्बचा स्फोट झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलं खेळत असताना त्यांनी बॉल समजून बॉम्ब उचलला. त्याचा ब्लास्ट होताच तेथे खेळणाऱ्या अनेक मुलांना त्याचा फटका बसला. मुलांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे 11 वर्षीय राज विश्वासला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर एका मुलाला आपला हात गमवावा लागला आहे. 

पांडुआ हे हुगळी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतं. येथील भाजपाचे उमेदवार लॉकेट चॅटर्जी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर लॉकेट धरणे आंदोलन करणार असून, जोपर्यंत चौकशीचा आदेश मिळत नाही, तोपर्यंत ते धरणे आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पांडुआच्या तिन्ना नेताजीपल्ली कॉलनीत तलावाच्या काठावर अनेक मुलं खेळत होती. अचानक स्थानिक लोकांना स्फोटाचा आवाज आला. तिथे जाऊन पाहिलं तर अनेक मुलांना बॉम्बचा फटका बसला होता. यानंतर लोकांनी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही दाखल झाला आहे. तेथे बॉम्ब कोणी ठेवला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. रुपम वल्लभ आणि सौरभ चौधरी अशी जखमी मुलांची नावं आहेत. हुगळीत हा बॉम्बस्फोट अशा वेळी झाला जेव्हा येथे काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. हुगळीच्या जागेवर पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. 
 

Web Title: bomb blast in hooghly west bengal minor killed lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.