केरळमध्ये मार्क्सवाद्यांच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला
By admin | Published: June 10, 2017 12:23 AM2017-06-10T00:23:15+5:302017-06-10T00:23:15+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या येथील जिल्हा कार्यालयावर शुक्रवारी काही अज्ञात इसमांनी दोन बॉम्ब फेकले. पोलिसांनी दिलेल्या
कोळिकोड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या येथील जिल्हा कार्यालयावर शुक्रवारी काही अज्ञात इसमांनी दोन बॉम्ब फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात कोणीही जखमी झालेले नाही. परंतु इमारतीच्या दर्शनी भागाच्या खिडकीच्या काचा फुटल्या.
एका बॉम्बचा फेकताक्षणी स्फोट झाला. दुसरा बाँब कुंपणाच्या आत पडला, मात्र त्याचा स्फोट झाला नाही. नंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला. रात्री दीडच्या सुमारास काही लोकांनी कार्यालयावर बॉम्ब फेकले. मार्क्सवादी पक्षाचे जिल्हा सचिव पी. मोहनन पक्षाच्या कार्यालयात गेल्यानंतर काही मिनिटांतच हे बॉम्ब फेकण्यात आले. मात्र त्यांना इजा झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
या बॉम्ब हल्ल्यांमागे राष्ट्रीय स्वयंसवेक संघ असल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आरोप केला. भारतीय जनता पक्षाच्या तिरुवनंतपूरम जिल्हा कार्यालयावर सात जून रोजी दोन अज्ञात इसमांनी याच प्रकारे पेट्रोल बाँब फेकला होता. त्यानंतर ही घटना घडली.
मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची नवी दिल्लीतील कार्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना हिंदू संघटनेच्या दोन सदस्यांनी आत घुसून घोषणाबाजी केली होती. (वृत्तसंस्था)