काश्मीरमधील दोन बसमध्ये बॉम्बस्फोट, एक रात्री दुसरा सकाळी; दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 08:27 AM2022-09-29T08:27:56+5:302022-09-29T08:30:22+5:30
उधमपूरमधील दोन बसमध्ये स्फोट झाल्याने पोलिस आणि तपास यंत्रणांनी तात्काळ परिसराला घेराव घातला आहे
उधमपूर - जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये ८ तासांत बॉम्बस्फोटाच्या दोन घटना घडल्या आहेत. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास एक बसमध्ये दुसरा स्फोट घडविण्यात आला. ADGP मुकेश सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. येथील डोमेल चौकाजवळ रात्री १०.३० वाजता पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बसमध्ये पहिला स्फोट झाला. अगदी त्याचप्रमाणे सकाळी ६.०० वाजता पुन्हा एकदा बसमध्येच धमाका झाल्याचं दिसून आलं. सुदैवाने स्फोटावेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. मात्र, रात्रीच्या स्फोटात २ जण जखमी झाले आहेत.
उधमपूरमधील दोन बसमध्ये स्फोट झाल्याने पोलिस आणि तपास यंत्रणांनी तात्काळ परिसराला घेराव घातला आहे. तसेच, येथील बस स्टँडला सर्वसामान्य प्रवाशांसाठी काही काळ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राथमिक तपास आणि बस स्टँडमधील जागांची पाहणी केल्यानंतर हे बसस्थानक पुन्हा पूर्ववत होईल. बॉम्बशोधक पथकेही घटनास्थळी रवाना झाली आहेत.
J&K | Another mysterious blast occurred on a bus in Udhampur. The second blast in last 8 hours. https://t.co/nKTPP3QKgVpic.twitter.com/SBGw6URNU9
— ANI (@ANI) September 29, 2022
दरम्यान, बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बसमध्ये झालेल्या स्फोटात २ जण जखमी झाले आहेत. आपल्या नियमीत सेवेनंतर बस एका पेट्रोल पंपाजवळ थांबली होती. त्याचवेळी अचानक बसमध्ये स्फोट झाला, त्यात दोघे जखमी झाले आहेत. या दोघांनाही जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.