एक्स बॉयफ्रेंडच्या चिंधड्या उडवण्यासाठी तिने बनवला बॉम्ब
By admin | Published: October 12, 2016 03:10 PM2016-10-12T15:10:34+5:302016-10-12T15:24:56+5:30
एका महिलेने आपल्या एक्स-बॉयफ्रेंडचा बदला घेऊन त्याच्या शरीराच्या चिंधड्या-चिंधड्या उडवण्यासाठी त्याचे घर बॉम्बने उडवण्याचा कट आखला होता.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - एका महिलेने आपल्या एक्स-बॉयफ्रेंडच्या शरीराच्या चिंधड्या-चिंधड्या उडवण्यासाठी त्याचे रहाते घर बॉम्बने उडवण्याचा कट रचला होता. एक्स-बॉयफ्रेंडने सोडल्याचा सूड उगवून त्याची हत्या करण्यासाठी तिने हा कट रचला होता. हरियाणातील पालवल जिल्ह्यातील ही घटना आहे. आरती असे या महिलेचे नाव असून हा कट रचण्यासाठी तिने प्रदीप दरोगा नावाच्या मित्राची मदत घेतली. फटाक्यांची दारू, काचांचे तुकडे, दगडांचा वापर करुन या दोघांनी तीन बॉम्ब बनवले. प्रदीपसोबतदेखील आरतीचे या आधी प्रेमप्रकरण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
एका हत्या प्रकरणात आरती आणि प्रदीपला पोलिसांनी चौकशी ताब्यात घेतले असता, ही धक्कादायक माहिती उघड झाली. 2010 साली आरतीची राकेश नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले, त्यानंतर राकेश पत्नी आणि तीन मुलांना सोडून आरतीसोबत राहू लागला. मात्र सहा वर्षांनंतर राकेशने स्वतःच्या पत्नी-मुलांकडे परतण्याचा निर्णय घेतला. राकेश आणि त्याच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी बाबूलाल नावाच्या नातेवाईकाने त्याला मदत केली. यामुळे संतापलेल्या आरतीने राकेश आणि बाबूलालचा सूड घेण्याचा ठरवले. राकेशला मारण्याआधी तिने 3 ऑक्टोबर रोजी बाबूलालची गळा चिरुन हत्या केली. राकेशसोबतच्या प्रेमप्रकरणाचा अंत होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबूलालला ठार मारल्याची कबुली आरतीने पोलीस चौकशीत दिली.
त्यानंतर, तिने शमशाहबाद कॉलनीतील राकेशच्या घरात प्रदीपच्या मदतीने बॉम्ब ठेवले. आरतीने आपल्याविरोधात एवढा भयानक कट रचल्याची भणकही राकेशला लागली नव्हती. मात्र बाबूलाल हत्याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरतीचा कट उधळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीनही बॉम्ब निकामी केले. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लागले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अब्बास खान यांनी दिली. दरम्यान, आरती आणि प्रदीपवर काही वर्षांपूर्वी अलिगडमध्येही एकाची हत्या केल्याचा आरोप आहे. तर प्रदीपविरोधात उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे एकूण 13 खटले दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.