मथुरा जवाहर बागच्या आत उभारला होता बॉम्ब कारखाना
By admin | Published: June 6, 2016 09:33 AM2016-06-06T09:33:41+5:302016-06-06T09:43:16+5:30
मथुरेतील जवाहरबाग एकवेळ फळबागांसाठी ओळखले जात होते. पण स्वाधीन भारत सुभाष सेनेने अतिक्रमण केल्यानंतर इथे दारुगोळयाचे भांडार आणि बॉम्ब बनवण्याचा कारखाना उभा केला.
Next
ऑनलाइन लोकमत
मथुरा, दि. ६ - मथुरेतील जवाहरबाग एकवेळ फळबागांसाठी ओळखले जात होते. पण स्वाधीन भारत सुभाष सेनेने अतिक्रमण केल्यानंतर इथे दारुगोळयाचे भांडार आणि बॉम्ब बनवण्याचा कारखाना उभा केला. २५ पेक्षा जास्त बळी गेलेल्या जवाहरबागमधील हिंसाचारानंतर तब्बल ७२ तासांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आत सोडण्यात आले.
पार्कच्या आतमध्ये जळालेल्या गाडया, घरे, विखरुन पडलेले सामान असे चित्र होते. जवाहर बागच्या एका भागामध्ये शस्त्रास्त्र, दारुगोळयाचे भांडार आणि बॉम्ब बनवण्याचा विभाग होता. स्वाधीन भारत सुभाष सेनेच्या राम वृक्ष यादवने २६० एकरच्या या परिसराला स्वत:चे साम्राज्य उभे केले होते.
रामवृक्षने जवाहरबागमध्ये त्याचे स्वत:चे वेगळे जग उभे केले होते. पार्कामध्ये सुभाष सेनेने दारुगोळयाचे भांडार उभारले होते. पोलिसांनी पार्कातून पाच किलो सल्फर, एक किलो पोटॅशियम आणि २.५ किलो गन पावडर जप्त केली.
पार्काच्या आत दुकाने होती. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था होती. मागच्या काही महिन्यांपासून सुभाष सेनेच्या सदस्यांनी आसपासच्या परिसरात स्वस्त दरात भाजीविक्री सुरु केली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली.