विमानामध्ये बॉम्बची अफवा; एक अटकेत
By admin | Published: April 21, 2016 03:27 AM2016-04-21T03:27:38+5:302016-04-21T03:27:38+5:30
अहमदाबादेतून १२५ प्रवासी आणि चालक दलाच्या सहा सदस्यांसह मुंबईला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या एका विमानाने बॉम्बच्या अफवेमुळे दोन तास विलंबाने उड्डाण घेतले
अहमदाबाद: अहमदाबादेतून १२५ प्रवासी आणि चालक दलाच्या सहा सदस्यांसह मुंबईला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या एका विमानाने बॉम्बच्या अफवेमुळे दोन तास विलंबाने उड्डाण घेतले. दरम्यान विमानातील एका प्रवाशाला त्याच्या आसनाखाली बॉम्ब लिहिलेली चिठ्ठी मिळाल्याने ताब्यात घेण्यात आले.
मुंबई-अहमदाबाद-मुंबई मार्गावरील हे विमान बुधवारी सकाळी येथे पोहोचले आणि बॉम्बची धमकी मिळाल्याने त्वरित ते स्वतंत्र धावपट्टीवर नेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील उड्डाणापूर्वी विमानाची साफसफाई करीत असलेल्या कर्मचाऱ्यास एका प्रवाशाच्या आसनाखाली चिठ्ठी मिळाली. त्यावर ‘बॉम्ब’ असे लिहिले होते. त्यानंतर लगेच अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली. विमानाला वेगळ्या धावपट्टीवर नेऊन पोलीस व बॉम्बस्क्वाडद्वारे त्याची सखोल तपासणी करण्यात आली. (वृत्तसंस्था)