दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 20:03 IST2024-05-12T20:01:50+5:302024-05-12T20:03:09+5:30
Delhi Bomb Threat e-mails : धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
Delhi Bomb Threat e-mails : नवी दिल्ली : दिल्लीतील दोन रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, बुरारी रुग्णालय आणि संजय गांधी रुग्णालयाला धमक्या आल्या आहेत. याशिवाय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGI) बॉम्बची धमकी मिळाली आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बुरारी रुग्णालय आणि संजय गांधी रुग्णालयात धमकीचा ईमेल आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनीही याप्रकरणी अग्निशमन विभागाला माहिती दिली आहे. तसेच, घटनेची माहिती मिळताच पोलिसांव्यतिरिक्त अग्निशमन विभाग, बॉम्ब आणि श्वान पथकाची पथके रुग्णालयात पोहोचली आहेत. सर्व ठिकाणी शोध सुरू आहे. तसेच, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGI) बॉम्बची धमकी मिळाली आहे. याठिकाणीही पोलीस तपास करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.
VIDEO | Security tightened outside Sanjay Gandhi Memorial Hospital in Delhi's Mangolpuri following a bomb threat. More details awaited. pic.twitter.com/PjKiinEUXl
— Press Trust of India (@PTI_News) May 12, 2024
अलीकडे एनसीआरमधील १०० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता. यानंतर ईमेलॲड्रेसची चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, याप्रकरणी पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही.
२५ मे रोजी दिल्लीत मतदान
दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी देशाची राजधानी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी समाजकंटक किंवा दहशतवादी एखादी घटना घडवून आणू शकतात. याला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा दल सज्ज आहेत.