हाडाचा शिक्षक... झाडाखाली शाळा घेणाऱ्या मास्तरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 09:50 AM2020-08-23T09:50:06+5:302020-08-24T17:28:01+5:30
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या यादीत जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरचे शिक्षक सुनिल कुमार यांचेही नाव आले आहे. झाकर येथील सरकारी शाळेत विद्यादानाचे काम सुनिल कुमार करतात.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने 2020 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील सुनिल कुमार यांना हा सन्मान मिळाला आहे. सुनिल कुमार हे हाडाचे शिक्षक असून विद्यार्थ्यांप्रती त्यांची तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून येते. केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देशातील 36 राज्य आणि केंद्रीय प्रदेशांमधून राज्यांच्या शिफारसीनुसार 153 शिक्षकांची निवड केली होती. त्यापैकी, 47 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. देशात लॉकडाऊन असल्याने ही निवड पद्धती व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या यादीत जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरचे शिक्षक सुनिल कुमार यांचेही नाव आले आहे. झाकर येथील सरकारी शाळेत विद्यादानाचे काम सुनिल कुमार करतात. आपल्या कृतीतूनच त्यांची विद्यार्थ्यांबद्दल असेलली आत्मियता आणि तळमळ पाहायला मिळते. सुनिल कुमार यांनी लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांचे क्लास घेतले आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम व्रत सुरुच ठेवल्याचं सुनिल कुमार यांनी म्हटलं. तसेच, इतरवेळी सामुदायिक वर्ग घेऊन, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्याचे काम करतो. कारण, शिक्षण हीच उत्तम भविष्याची गुरुकिल्ली आहे, असे कुमार यांनी म्हटलंय. केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केल्याचा आनंदही कुमार यांनी व्यक्त केला.
J&K: Sunil Kumar, a govt school teacher from Udhampur to be conferred with National Award for Teachers 2020 by Ministry of Education. He says,"As schools remain closed, I've been giving lessons digitally&also organising community classes. Education is the key to a better future." pic.twitter.com/LkEI9LiRXG
— ANI (@ANI) August 23, 2020
सुनिल कुमार यांच्या निवडीबद्दल जम्मू आणि काश्मीरमधील शिक्षण विभागाच्या संचालिका अनुराधा गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुनिल कुमार यांच्या निवडीचे पत्र आणि फोटो शेअर करत गुप्ता यांनी ही अभिमानास्पद कामगिरी असल्याचं म्हटलंय. जम्मू आणि काश्मीरमधील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये सुनिल कुमार आणि रोहिनी सुलताना या दोघांचा समावेश आहे.
दरम्यान, सुनिल कुमार यांनी त्याबद्दल संचालिका अनुराधा गुप्ता यांचे आभार मानले, तसेच आपल्या सहकार्य व मार्गदर्शानामुळेच ही मजल मारता आली, असेही कुमार यांनी ट्विटरवरुन म्हटले.
Thanks Honorable Director madam under whose kind support and guidance I have achieved this milestone. https://t.co/ylFNEOskad
— SUNIL KUMAR (@sunil_just) August 21, 2020
झाडाखालची शाळा आणि शांतिनिकेतनची आठवण
द्वापारयुग, त्रेतायुगातील शिक्षण हे ऋषी-मुनींकडून घेतले जाई. त्यावेळी,आश्रमातच शाळा भरत, अगदी राजा- महाराजांच्या मुलांनाही आश्रमात येऊन ज्ञान ग्रहण करावे लागत. झाडाखालीच मुलांचे पाठ शिकवले जात. झाडाखालीच वेद अभ्यासाचे धडे गिरवले जात.
रवींद्रनाथ टागोर यांच्यावरही याच शिक्षणपद्धतीचा प्रभाव होता. इंग्रजांनी सुरू केलेली कारकून तयार करणारी फॅक्टरी म्हणजे 'शाळा' नव्हे. निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. भोवतालच्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या ग्रहण शक्तीवर होतो. म्हणून, रवींद्रनाथ यांनी शांतिनिकेतन उभारले. विद्यार्थ्यांना झाडाखालची शाळा त्यांनीच दिली. याच शांतिनिकेतनमध्ये पु. ल. देशपांडे यांनीही धडे गिरवले आहेत. 1971 साली तीन महिने येथील झाडाखालच्या शाळेतून त्यांनी बंगाली भाषेची बाराखडी शिकली. 'मुक्काम शांतिनिकेतन' या पुस्तकात पु. ल. नी आपल्या शांतिनिकेतनमधील आठवणींना उजाळा दिला आहे. तेथील झाडाखालच्या शाळेच महत्वही त्यांनी नॅचरली समजावून सांगितलं आहे.
उधमपूरमधील सुनिल कुमार यांनी भरवलेली 'शाळा' पाहून रवींद्रनाथ टागोर, शांतिनिकेत अन पु.ल. या त्रिकोणी संगमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.
शिक्षक दिनी केला जातो शिक्षकांचा सन्मान
देशात दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवन दिल्ली येथे हा सोहळा संपन्न होत असतो.