बोगस सिमकार्डप्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By Admin | Published: June 28, 2016 08:12 PM2016-06-28T20:12:35+5:302016-06-28T20:19:52+5:30
युवकाचे दस्तावेज, छायाचित्र व बनावट स्वाक्षरीचा वापर करून सिमकार्ड खरेदी-विक्री करणा-या तिघांविरुद्ध मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल.
अकोला: हबीब नगरमधील खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी युवकाचे दस्तावेज, छायाचित्र व बनावट स्वाक्षरीचा वापर करून सिमकार्ड खरेदी-विक्री करणार्या तिघांविरुद्ध डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये टेलीनॉर कंपनीचा वितरक, किरकोळ विक्रेता व अज्ञात सिमकार्डधारक यांचा समावेश असून दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख नितीन पाटील यांच्या तपासणीनंतर हा गुन्हा उघड झाला.
खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी जुनैद शाह बरकत शाह या युवकाच्या दस्तावेजाचा व छायाचित्रासह बनावट स्वाक्षरीचा वापर करून त्याच्या नावावर दुसर्या व्यक्तीने युनीनॉर कंपनीचे सिमकार्ड खरेदी केली. त्यानंतर सदर सिमकार्ड वापरात आणले. हा प्रकार युवकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने या प्रकरणाची तक्रार केली. या तक्रारीवरून दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख नितीन पाटील यांच्या पथकाने सिमकार्ड खरेदी-विक्रीसह सर्व प्रक्रियेची तपासणी केली. यामध्ये अज्ञात सिमकार्डधारकाने बनावट दस्तावेजाद्वारे खैर मोहम्मद प्लॉट येथील सैय्यद निजाम याच्या मालकीच्या किरकोळ सिमकार्ड विक्रेता अयान मोबाइल नामक दुकान तसेच दोसानी सेल्स ॲण्ड सर्व्हिसेसचा मालक व वितरक आणि अज्ञात सिमकार्डधारक यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये युवकाने तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात असलेल्या दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख रात्र-दिवस बोगस सिमकार्डची तपासणी करीत असून यामध्ये संशय आढळल्यानंतर बोगस सिमकार्डधारकांवर व विक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. या पथकाने आतापर्यंत २० च्यावर कारवाई केल्या आहेत.