दिल्लीत वह्या-पुस्तकांची दुकाने उघडली, सरकारचे नवे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:38 AM2020-04-29T04:38:08+5:302020-04-29T04:38:17+5:30
सरकारचे आदेश येताच आजपासून (मंगळवार) दिल्लीतील बहुतांश भागांमधील दुकाने उघडली.
नवी दिल्ली : दिल्ली सरकारने नवे आदेश जारी करताना इलेक्ट्रिशियन, प्लंबर यांच्या सेवांवरील निर्बंध हटविले असून, शालेय वह्या-पुस्तके, स्टेशनरी तसेच कूलर, फॅनची दुकाने उघडण्याचीही परवानगी दिली आहे. सरकारचे आदेश येताच आजपासून (मंगळवार) दिल्लीतील बहुतांश भागांमधील दुकाने उघडली.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सोमवारी रात्री काही सेवा व व्यापारांना सवलती बहाल करीत असल्याचे आदेश काढले. यात वॉटर प्युरिफायरच्या दुकानांचा समावेश आहे. २२ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत जवळपास ३५ दिवस दुकान बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास दुकाने सज्ज झाली; पण दिवसभर ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
या दिवसांत परीक्षा असतात. त्यामुळे विद्यार्थी पालकांची वह्या-पुस्तकांच्या तसेच स्टेशनरीच्या दुकानांमध्ये गर्दी असते; पण परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद बघायला मिळाला नाही.
कूलर तसेच फॅनच्या विक्रीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत असतो; पण या दुकानांमध्येही पहिल्या दिवशी शुकशुकाटच होता. दरम्यान, सर्व दुकानदारांना फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवायचा आहे. या नियमांचे पालन होताना दिसले नाही, तर तातडीने संबंधित दुकान बंद केले जाणार आहे. दुसरीकडे प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वॉटर प्युरिफायरची दुरुस्तीची सेवा देणाºया अर्बन क्लॅपसारख्या कंपन्यांनी मंगळवारपासून आपल्या सेवा बहाल केल्या आहेत. उकाड्याने त्रस्त दिल्लीकरांच्या सोयीसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी हे आदेश काढले. दरम्यान, स्टेशनरी व वह्या-पुस्तकांच्या दुकानांचे उंदरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान करून ठेवलेले आहे. त्यामुळे ही दुकाने उद्यापासून (बुधवार) सुरळीत होण्याची शक्यता आहे.
>यांनाही मिळाली सूट
दिल्ली सरकारच्या नव्या आदेशांमध्ये पशुवैद्यक, पॅथॉलॉजी लॅब, व्हॅक्सिन आदी आवश्यक साहित्य पुरविणारी दुकाने उघडण्याची सवलतही देण्यात आली आहे. वैज्ञानिक, परिचारिका, वैद्यकीय सहायक, लॅब टेक्निशियन, पशुचिकित्सालयाशी जुळलेले कर्मचारी आदींना शहरात कामाच्या निमित्ताने फरण्याची मुभा असेल. त्यांना ओळखपत्र बाळगावे लागणार आहे. यासोबतच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, मनोरुग्ण आदींसाठी निवारागृहे चालविणाºया संघटनांनाही सवलती देण्यात आल्या आहेत.