सीमेवर भुयार, भारतीय जवांनांनी उधळले पाकचे मनसुबे
By admin | Published: February 14, 2017 09:29 PM2017-02-14T21:29:44+5:302017-02-14T22:01:46+5:30
जम्मू काश्मीरमधील सांबातील रामगड सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाला एक बोगदा आढळून आला आहे. सीमा सुरक्षा दलाला आढळलेला बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहे.
ऑनलाइन लोकमत
जम्मू कश्मीर, दि. 14 - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका भुयाराचा छडा लावल्यामुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. भुयार प्रतिबंधक मोहिमेदरम्यान बीएसएफने सोमवारी रामगड सेक्टरमध्ये भारतीय सीमेच्या आत २० मीटर लांबीच्या भुयाराचा छडा लावला. त्यामुळे भारतीय भूभागात दहशतवादी घुसविण्याचे पाकचे दुष्ट मनसुबे उधळले गेले आहेत, असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक धर्मेंद्र पारिक यांनी पत्रकारांना सांगितले.
या भुयाराची रुंदी अडीच फूट आहे. या भुयाराचे दुसरे टोक पाकिस्तानी भूभागात आहे. तथापि, भुयार पूर्णपणे तयार झाले नव्हते. तत्पूर्वीच त्याचा छडा लावण्यात आल्यामुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत.