१२ वर्षांच्या पाकिस्तानी मुलासाठी सीमा उघडली; पित्याने म्हटले 'भारत महान आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 04:29 PM2020-03-27T16:29:07+5:302020-03-27T16:32:09+5:30
पाकिस्तानचा हा मुलगा कोणी राजनैतिक अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा मुलगा नव्हता. पण दोन्ही देश त्याच्यासाठी दुश्मनी विसरले.
इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर कदाचित एकही दिवस असा नसेल की भारतपाकिस्तानच्या सीमेवर गोळीबार झाला नसेल. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव एवढा वाढलेला आहे की तिथून केवळ पक्षीच ये जा करू शकतात. रेल्वे, बस सेवा बंद करून टाकलेल्या आहेत. नागरिकांची ये-जा ही थांबवलेली आहे. अशा काळात भारतानेपाकिस्तानच्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलासाठी अटारी बॉर्डरवरील दरवाजे उघडत शत्रूत्व काहीकाळासाठी बाजुला ठेवले होते.
पाकिस्तानचा हा मुलगा कोणी राजनैतिक अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा मुलगा नव्हता. तर त्याला हृदयरोग होता. साबीह शिराज असे या मुलाचे नाव आहे. त्याचा जीव वाचविण्यासाठी भारताने आपले हृदय विशाल करत पाकिस्तानच्या सर्व कूकर्मांकडे दुर्लक्ष केले. साबीहवर २५ फेब्रुवारीला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. साबीह त्याच्या आई-वडिलांसोबत १८ फेब्रुवारीला भारतात आला होता. त्याच्यावर नोएडातील जेपी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर साबीहला 16 मार्चपर्यंत निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. १८ मार्चला त्याला सोडण्यात आले. मुलगा आणि आई वडील तिघेही अटारी बॉर्डरवर आले. मात्र, त्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी खूप संकटांना सामोरे जावे लागले.
साबीह याचे वडील शिराज अरशद यांनी सीमेपलिकडे जाण्यासाठी भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांना खूप विनंती केली. त्यांना मुलाची हृदय शस्त्रक्रिया झाल्याचेही सांगितले मात्र, त्यांनी नकार दिला. कारण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ४० काश्मीरी मुलींना भारतात पाठविण्यास नकार दिला होता.
यावर भारताच्या जवानाने पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगितले. मात्र तिथूनही नकारच आला. यानंतर शिराज यांनी पाकिस्तानच्या एका पत्रकाराला याची माहिती दिली. त्याने अमृतसरचे पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांच्या कानावर ही गोष्ट घातली. रॉबिन अटारी बॉर्डरवर मदतीसाठी पोहोचले मात्र, तोपर्यंत इमिग्रेशन अधिकारी निघून गेले होते. रॉबिन यांनी या कुटुंबाची अमृतसरच्या घरी राहण्याची सोय केली.
दुसऱ्या दिवशी दोन्ही पत्रकारांनी आपापल्या देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासातून त्या तिघांना पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी पास जारी करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भारतीय जवानांनी आपल्याला प्रोटोकॉलनुसार पाकिस्तानच्या सीमेवर नेऊन सोडल्याचे शिराज यांनी सांगितले. आपल्या मुलाच्या उपचारासाठी भारताने शत्रूत्व बाजुला ठेवल्याचे उद्गार त्यांनी काढले. भारत हा महान देश आहे, आमचे हृदय जिकल्याचे, त्यांनी यावेळी म्हटले.