Border: सीमेवर तणाव आहे, बारीक लक्ष ठेवा, संरक्षणमंत्र्यांच्या लष्कराला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 08:32 AM2023-04-20T08:32:54+5:302023-04-20T08:33:37+5:30
Border: उत्तर सीमेवरील चिनी सैन्यांची तैनाती पाहता तेथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) बारीक लक्ष ठेवा, असा सूचना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्या.
नवी दिल्ली : उत्तर सीमेवरील चिनी सैन्यांची तैनाती पाहता तेथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) बारीक लक्ष ठेवा, असा सूचना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्या.
सूत्रांनी सांगितले की, लष्करी कमांडर परिषदेला संबोधित करताना सिंह यांनी कोणत्याही विशिष्ट संदर्भाचा उल्लेख न करता सशस्त्र दलांना जगभरात होत असलेल्या भू-राजकीय बदलांची दखल घेण्याचे आणि त्यानुसार त्यांच्या योजना आणि रणनीती आखण्याचे आवाहन केले.
संरक्षणमंत्र्यांची ही टिप्पणी पूर्व लडाखमध्ये तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आली आहे. “देशाची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला अत्याधुनिक शस्त्रे आणि सुविधा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिल्लीत सोमवारी पाच दिवसीय कमांडर परिषदेला सुरुवात झाली. यामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेची आव्हाने आणि सैन्याची लढाऊ क्षमता वाढवण्याच्या मार्गांवर विचार केला जात आहे.
जम्मू-काश्मीर, ईशान्येत स्थैर्य
nजम्मू-काश्मीरचा संदर्भ देत संरक्षणमंत्री सिंह म्हणाले की, तेथे शांतता आणि स्थैर्य आहे आणि केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी कारवायांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
nभारतीय लष्कराच्या कारवाईनंतर ईशान्येकडील राज्यांमध्येही अंतर्गत सुरक्षा परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. तरीही, शांततेसाठी सरकारच्या प्रयत्नांना आव्हान देणाऱ्या देशविरोधी संघटनांबाबत आम्हाला सतर्क राहावे लागेल.