Boris Johnson: "अमिताभ बच्चन अन् सचिन तेंडुलकर असल्यासारखं वाटलं", मोदींच्या पाहुणचाराने भारावले बोरिस जॉन्सन!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 02:18 PM2022-04-22T14:18:38+5:302022-04-22T14:20:16+5:30
Boris Johnson News: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतात करण्यात आलेल्या त्यांच्या स्वागताने भारावून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले खास मित्र असल्याचे सांगून ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध दृढ झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक करारही झाले आहेत.
नवी दिल्ली-
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी भारताकडून करण्यात आलेल्या त्यांच्या पाहुणचाराचं कौतुक केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख खास मित्र असा करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. "गुजरातमध्ये ज्याप्रकारे माझं स्वागत झालं ते पाहता मी सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्यासारखं वाटलं. पंतप्रधान मोदी हे माझे खास मित्र आहेत आणि दोन्ही देशांमधील संबंध आता आणखी घट्ट झाले आहेत", असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.
जॉन्सन यांनी पत्रकारांना दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेच्या त्यांच्या भारत भेटीची माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. गुजरातमध्ये आपल्या स्वागताने भारावून गेलेल्या जॉन्सन यांनी म्हटले की, जणू मी सचिन आणि अमिताभ असल्यासारखं वाटलं. संपूर्ण अहमदाबादमधील माझ्या पोस्टर्सनं मी भारावून गेलो होतो.
आव्हानात्मक काळात दोन्ही देश एकमेकांजवळ
सध्याच्या आव्हानात्मक काळात भारत आणि ब्रिटन जवळ आले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा भागीदारी वाढविण्यासाठी चर्चा झाली आहे, असं बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं. याशिवाय अनेक संरक्षण करारही झाले आहेत. फायटर जेट तंत्रज्ञानापासून ते सागरी तंत्रज्ञान भारताशी शेअर करण्यापर्यंत चर्चा झाली असल्याचं जॉन्सन यांनी सांगितलं. कोरोनापासून बचावासाठी मीही भारतीय लस घेतली आहे. त्यासाठी भारताचे मी आभार मानतो, असंही जॉन्सन म्हणाले.
#WATCH I've the Indian jab (COVID19 vaccine) in my arm, and it did me good. Many thanks to India, says British PM Boris Johnson in Delhi pic.twitter.com/LiinvUCACB
— ANI (@ANI) April 22, 2022
मोदींनी केला युक्रेन युद्धाचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा युक्रेन युद्ध तात्काळ थांबवण्यावर आणि ही समस्या सोडवण्यासाठी मुत्सद्दी पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला. आम्ही जॉन्सन यांच्याशी सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाबद्दल चर्चा केली. विशेष म्हणजे युक्रेन युद्धाबाबत भारत रशियाला अत्यंत सावध उत्तर देत आहे, असंही मोदी म्हणाले.